मातब्बरांचे गुडघ्याला बाशिंग
By admin | Published: December 11, 2015 11:15 PM2015-12-11T23:15:17+5:302015-12-12T00:11:39+5:30
‘कुंभी-कासारी’चे रणांगण : प्रचाराला प्रारंभ, उमेदवारी मिळणारच या आशेवर माघारीपूर्वी भेटीगाठी
प्रकाश पाटील -- कोपार्डे--कुंभी-कासारी निवडणुकीसाठी सत्ताधारी व विरोधी गटातील मातब्बरांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. सत्ताधारी गटातील आमदार नरके गटातून यावेळी विद्यमान संचालकांपैकी १० ते १२ संचालकांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे चित्र असून प्रत्येक गटातील इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत, तर विरोधी गटातील मातब्बरांपैकी आणि या निवडणुकीसाठी रिंगणात नसणार असे जाहीर केले होते तेच आता प्रचाराला लागले आहेत. यामुळे माघारीपूर्वीचे ‘कुंभी’चे कार्यक्षेत्र राजकीय हालचालीने ढवळून निघाले आहे.१५ डिसेंबर ही माघारीची तारीख असून सत्ताधारी आमदार चंद्रदीप नरके व विरोधी शाहू आघाडीकडून उमेदवार निवडीला वेग आला आहे. आ. चंद्रदीप नरके यांच्याकडे पॅनेलमध्ये स्थान मिळावे म्हणून इच्छुकांकडून दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. प्रत्येक गटातून इच्छुक असणारे आपल्या कार्यकर्त्यांच्या लवाजम्यासह नरके गटाचे मुख्य केंद्र असणाऱ्या आ. नरकेंच्या शिवाजी पेठेतील बंगल्यावर शक्तिप्रदर्शन करत आहेत. आ. नरके गटाकडे इच्छुकांची मोठी रांग असून उमेदवारी नाकारल्यानंतर निर्माण होणाऱ्या असंतोषाला कसे रोखायचे हा प्रश्न आ. नरके यांच्यासमोर आहे.
सध्या ‘कुंभी कासारी’मध्ये आ. चंद्रदीप नरकेंची एकहाती सत्ता आहे. या निवडणुकीसाठी २१ संचालक मंडळाचे बोर्ड असून मागील वर्षीपेक्षा ती संख्या ४ ने कमी झाल्याने पुन्हा अडचणी आ. नरकेंसमोर आहेत. सध्या विद्यमान असणाऱ्या संचालकांपैकी सर्वच्या सर्व याही निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. सध्या गट नं. ५ मधून स्वत: आ. चंद्रदीप नरके, विद्यमान संचालक पी. डी. पाटील, सुभाष पाटील (लोंघे) यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे एका मेळाव्यादरम्यान ठरल्याचे वृत्त आहे. गट नं. १ मधून अनिल पाटील, विलास पाटील व शंकर पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी शेवटच्या टप्प्यात बदल झाला तरच असे सांगितले जात आहे. गट नं. २ मध्ये किशोर पाटील, दादासो लाड या विद्यमान संचालकांबरोबर महिला संचालक अनिता पाटील यांचीही दावेदारी आहे. गट नं. ३ मध्ये संजय पाटील (खुपीरेकर) यांचे नाव निश्चित असून कृष्णात पाटील, भगवान पाटील, प्रकाश पाटील, आनंदराव पाटील यांची चर्चा असून गट नं. ४ मध्ये जयसिंग पाटील- ठाणेकर, आनंदराव माने यांची नावे निश्चित आहेत.
निवडणूक लढविणार नाही म्हणणारेच पुढे...
निवडणूक लढविणार नाही म्हणणारेच पुढे...
विरोधी शाहू आघाडीतून काही दिवसांपूर्वी आपण निवडणूक लढवणार नाही, असे म्हणणारे नेते पुंडलिक पाटील, तुकाराम पाटील यांनी उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे प्रदर्शन केले आहे.
गट नं. १ मधून एस. के. पाटील, बाळ पाटील व बी. बी. पाटील यांची नावे निश्चित आहेत. गट नं. २ मधून बाजीराव खाडे, पुंडलिक पाटील आघाडीवर आहेत. गट नं. ३ मधून तानाजी मोरे, बुद्धीराज पाटील, तुकाराम पाटील ही नावे आघाडीवर आहे.
गट नं. पाचमधून प्रकाश देसाई, संदीप नरके व वैकुंठनाथ भोगावकर अशी उत्पादक गटातील प्रतिनिधींची मांडणी झाली आहे.
राखीव गटातील उमेदवार निवडताना पॅनेलप्रमुख मतदानाचा आकडा व राजकीय समीकरणे बघून महिला प्रतिनिधी, भटक्या व विमुक्त जाती व इतर मागासवर्गीय व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवार निश्चित होणार आहेत.
महिला गटासाठी दोन्ही गटांकडून ज्या गावात जास्त मतदान आहे त्या गावांना प्राधान्य असणार आहे. सत्ताधारी व विरोधी गटातील नेत्यांनी आपली उमेदवारी निश्चित समजून प्रचाराचा धडाका लावला आहे.