मूळ हेतू दरोड्याचा की अत्याचाराचा !
By admin | Published: September 13, 2015 12:11 AM2015-09-13T00:11:39+5:302015-09-13T00:14:10+5:30
पोलिसांना अनेक शंका : चोर सोडून संन्याशाला अडकविण्याचा होतोय आरोप
सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावरील एका सुरक्षारक्षकाच्या झोपडीवर गुरुवारी पडलेला सशस्त्र दरोडा आणि अत्याचारानंतर संपूर्ण जिल्हा हादरून गेलाय. दरोडेखोरांनी एका सुरक्षारक्षकाच्या पत्रेवजा झोपडीची केवळ दरोड्यासाठी निवड केली की त्यांचा मूळ हेतू अत्याचाराचा होता, या मुद्द्यावर पोलिसांनी स्थानिक पातळीवर तपास केंद्रित केला आहे. परंतु, या प्रकरणाचा प्राथमिक तपास करतानाही आता पोलिसांवर आरोप होऊ लागल्याने तपासाला वादावादीचे ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची घटना बहुदा पहिल्यांदाच घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची घटनास्थळी रीघ लागली आहे. घटनास्थळ पाहून प्रत्येकाच्या मनात अनेक शंकांचे काहूर माजतंय. निर्जनस्थळी राहात असलेल्या झोपडीमधील दाम्पत्याची आर्थिक स्थिती कशी असेल, हे तेथे पाहिल्यानंतर दिसून येते. हलाखीत दिवस काढणाऱ्या त्या दाम्पत्याकडे फारसा ऐवजही नव्हता. असे असताना दरोडेखोरांनी लुटालुटीच्या की केवळ अत्याचाराच्या उद्देशाने हा प्रकार केला, याविषयी स्वत: पोलीसही संभ्रमात पडले आहेत. त्या ठिकाणी बांधकाम सुरू असल्याने यापूर्वी तेथे कोणाची वादावादी झाली होती का? याविषयीही पोलीस वेगळ्या पद्धतीने तपास करीत आहेत. मूळ हेतू दरोड्याचा का अत्याचाराचा? अशी शक्यता गृहीत धरूनही पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. (प्रतिनिधी)
हॉटेल कर्मचाऱ्यांची माहिती उशिरा का ?
या दाम्पत्याच्या झोपडीवर दरोडा टाकण्यापूर्वी तेथे समोर असलेल्या एका हॉटेलमध्ये दरोडेखोर गेले होते. त्यांनाही चाकूचा धाक दाखवून लुटले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत याबाबत पोलिसांना काहीच कळविले गेले नाही.
अत्याचाराचा तपास करण्यासाठी पोलीस घटनास्थळी आल्यानंतर सुरुवातीला या हॉटेलमधील कामगारांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. खूप चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे शंका आल्याने हॉटेलच्या तीन कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, असे पोलिसांनी सांगितले. तर त्या हॉटेलचे मालक असलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. माझ्या मुलाला आणि कामगारांंना रात्री आणि दिवसभर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी थांबवून ठेवले आहे. हा आमच्यावर अन्याय असून, पोलिसांनी संबंधितावर कारवाई न केल्यास दि. २० रोजी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशाराही त्या निवृत्त अधिकाऱ्याने निवेदनाद्वारे दिला आहे.