चिंचवाडमधील पेयजल योजना खासगी जागेत, नावावर नसताना कोणत्या आधारावर पूर्ण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 11:44 PM2018-04-04T23:44:51+5:302018-04-04T23:44:51+5:30
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्टÑीय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प
संतोष बामणे।
उदगाव : चिंचवाड (ता. शिरोळ) येथील राष्ट्रिय पेयजल योजना ही एक कोटी ६९ लाख रुपयांची योजना पूर्ण होऊन तीन वर्षे उलटले तरी पाण्याची टाकी, फिल्टर हाऊस, शुद्धिकरण प्रकल्प शेतकऱ्यांच्या खासगी जागेतच आहेत. त्यामुळे ही योजना ग्रामपंचायतीच्या नावावर नसतानाही कोणत्या पद्धतीने पूर्ण केली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने पाणी यासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात हलगर्जीपणा केल्यामुळे पेजयल योजना वादात सापडली आहे. त्यामुळे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी, सरपंच व सदस्यांवर कारवाई होण्याची शक्यता, तसेच पेयजल योजनेवर टांगती तलवार आहे.
तत्कालीन सरपंच विठ्ठल घाटगे यांच्यासह सदस्यांनी सन २०१३ मध्ये राष्टÑीय पेयजल योजना मंजूर करून आणली. याची रक्कम एक कोटी ६९ लाख रुपये आहे, तर २०१४ च्या नूतन सरपंच पुष्पाताई चौगुले, रंजना घाटगे, विमल कदम, सुरेखा वराळे यांच्या कालावधीत ही योजना अंमलात आली. चिंचवाड-शिरोळ मार्गावरील दि न्यू हायस्कूलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बाबासाहेब व रावसाहेब चौगुले यांच्या शेतातील चार गुंठे क्षेत्रात ग्रामपंचायतीने राष्ट्रिय पेयजल योजनेसाठी प्रतिगुंठा एक लाख रुपये दराने जागा घेतली. मात्र, त्याचे खरेदीपत्रक न करताच राष्टÑीय पेयजल योजना उभी केली. तसेच पेयजल योजना उभी करण्यासाठी जागा कमी पडल्याने आणखी जागा अतिक्रमण करून वापरली आहे.
चिंचवाड ग्रामपंचायतीने पेयजल योजना पूर्ण करण्यासाठी कोणत्या जागेची कागदपत्रे जमा केली आहेत, कोणती जागा ग्रामपंचायतीची म्हणून दाखविली आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच शासनाकडून एक कोटी ६९ लाखांच्या निधीतून ज्या जागेत पेयजल योजना उभी करण्यात आली आहे. ती जागा अद्याप रावसाहेब व बाबासाहेब चौगुले यांच्याच नावावर कशी आहे. आजपर्यंत ग्रामपंचायतीने ती जागा अद्याप खरेदी का केली नाही,त्यामुळे ग्रामविकास अधिकारी यांनी गेल्या पाच वर्षांत जागा नावावर न करता कामात हलगर्जीपणा केला आहे. तसेच पदाधिकाºयांनीही याकडे दुर्लक्ष केले आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नाईक यांनी गावचा कारभार सुधारावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
पेयजल योजना बांधताना चार गुंठे जमिनीपेक्षा जास्त जागेत अतिक्रमणाची तक्रार ग्रामपंचायतीकडे केली आहे. आमच्याकडे जास्तीच्या अतिक्रमीत जमिनीचा मोबदलाही दिला नाही व करारपत्रही केले नाही. त्यामुळे योजनेची सर्व जागा माझ्या व भावाच्या नावावर आहे.
- रावसाहेब चौगुले, शेतकरी चिंचवाड
आॅगस्ट २०१७ मध्ये चिंचवाड ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यामुळे मागील कारभाराची आम्हाला माहिती नाही. जर ग्रामपंचायतीने दुसºयाच्या नावावर असलेल्या जागेत योजना उभी केली असेल तर ही जागा ग्रामपंचायतीच्या नावावर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- कल्पना नाईक, सरपंच चिंचवाड.