शासकीय कार्यालयात लाचखोरीला ‘पंटर’ चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:30 AM2021-08-25T04:30:40+5:302021-08-25T04:30:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तुमचे काम करायचे असेल तर साहेबांसाठी पैसे द्यावे लागतील’ असा निरोप घेऊन बहुतांशी शासकीय ...

The basis of 'punter' for bribery in government offices | शासकीय कार्यालयात लाचखोरीला ‘पंटर’ चा आधार

शासकीय कार्यालयात लाचखोरीला ‘पंटर’ चा आधार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तुमचे काम करायचे असेल तर साहेबांसाठी पैसे द्यावे लागतील’ असा निरोप घेऊन बहुतांशी शासकीय कार्यालयाच्या बाहेर पंटर तयारच असतात. शासकीय अडलेली कामे घेऊन येणाऱ्या सावजाच्या शोधात हे पंटर कार्यालयाबाहेर असतातच. त्याला गाठून थेट साहेबांच्या नावे लाखो रुपये लाचेची मागणी करतात. पण अशा पंटरच्याही मुसक्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवळल्या. गेल्या पावणेदोन वर्षात पुणे विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे २२६ लाचप्रकरणात छापे टाकून ३११ व्यक्तींवर कारवाई केली. त्यामध्ये तब्बल ६६ खासगी व्यक्ती वजा पंटरचा समावेश असल्याचे आढळले आहे. विशेषत: शासनाच्या महसूल विभागात ही पंटरची टोळी सक्रिय असल्याचे आढळले आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेल्या सुनावणी दाव्याचा निकाल अपर जिल्हाधिकारी यांना सांगून यांच्या बाजूने लावून देण्यासाठी तीन लाखांची लाच स्वीकारताना तीन पंटरला इचलकरंजीत अटक केली. त्या अनुषंगाने पुणे परिक्षेत्राचा आढावा घेतला असता बहुतांश शासकीय कामे करुन देण्यासाठी पंटरांचा सुळसुळाट झाल्याचे स्पष्ट आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या पाच जिल्ह्याच्या पुणे विभागात लाचखोरीसाठी पंटरचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचे स्पष्ट झाले. विशेषत: शासनाच्या महसूल विभागात पंटरद्वारे लाच स्वीकारणाऱ्यांची प्रकरणे लाचखोरावर कारवाई झाल्यानंतर चव्हाट्यावर आली आहेत. त्यानंतर पोलीस खात्याचा नंबर लागत आहे.

कोरोना महामारीतही ‘लाचेचा’ धंदा तेजीत

कोरोना महामारीत शासकीय कार्यालये बंद असली तरीही ती सुरु झाल्यानंतर ही पंटरांची टोळी सरसावल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठ महिन्यात १३ लाचखोरांवर छापे टाकून कारवाई केली. त्यामध्ये तब्बल ७ खासगी पंटरचा समावेश असल्याचेही उघड झाले. तर गेल्या दीड वर्षात एकूण ४० लाचखोरीच्या प्रकरणात १९ पंटरना बेड्या ठोकल्या.

शासकीय अधिकाऱ्यांचे पंटर

पुणे विभागातील पाच जिल्ह्यात जानेवारी २०२० ते जुलै २०२१ पर्यंतच्या कालावधीत तब्बल २२२ शासकीय अधिकारी व कर्मचारी लाच प्रकरणात सापडले.

हे थेट लाचेची रक्कम न घेता खासगी व्यक्तीला पंटर म्हणून नेमून त्याच्यामार्फत लाच घेताना आढळले, त्यामुळे अशा सुमारे ६६ पंटरांनाही अटक झाली. अशा खासगी व्यक्तींना शिक्षा होण्याचे प्रमाणही चांगले असल्याची माहिती लाचलचुपत प्रतिबंधक कोल्हापूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

पुणे विभागात जानेवारी २०२० ते जुलै २०२१ पर्यंतची कारवाई

एकूण छापे : २२६

एकूण व्यक्तीवर कारवाई : ३११

शासकीय अधिकारी, कर्मचारी : २२२

खासगी पंटरचा वापर : ६६

कोट...

१९८८ च्या कायद्यात २०१८ च्या सुधारित कायद्यान्वये कलम ७ अ अंतर्गत शासकीय कामासाठी खासगी व्यक्ती लाचेची मागणी करत असेल तर त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येते. लाच मागणीच्या तक्रारीसाठी नागरिकांनी पुढे यावे. - सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग.

Web Title: The basis of 'punter' for bribery in government offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.