रोटी डेच्या निमित्याने भुकेलेल्यांना सेवा निलयमचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 12:51 PM2021-03-03T12:51:17+5:302021-03-03T12:54:15+5:30
Rodi Day Kolhapur- निलयम संस्थेने सोमवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरातील फिरस्त्यांना, गरजू प्रवाशांना पोटभर भोजन देऊन रोटी डे साजरा केला.
कोल्हापूर : नेहमी हजारो रुपये खर्च करून व्हॅलेंटाइन डे, रोज डे आदी विविध डे उत्साहात साजरे करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना मात्र सोमवारच्या (दि. १) रोटी डेचा विसर पडला. अनेक गरजूंना, फिरस्त्यांना पोटाची भूक भागविण्यासाठीही एक रोटीही मिळत नाही. अशा भुकेलेल्यांकडे दुर्लक्ष करून पोट भरून ढेकर देणाऱ्यांवर हजारो रुपये खर्च करणाऱ्या या संस्था रोटी डेच्या प्रसंगी कुठं गायब झाल्या? असा प्रश्न अनेकांना पडला. पण ही उणीव सेवा निलयम संस्थेने भरून काढली. संस्थेतर्फे सोमवारी सायंकाळी मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसरातील फिरस्त्यांना, गरजू प्रवाशांना पोटभर भोजन देऊन रोटी डे साजरा केला.
फेब्रुवारी महिना आला की वेगवेगळे डे साजरा केले जातात. तर भुकेलेल्यासाठीही एक दिवस असावा, म्हणजेच रोटी डे. कोल्हापुरातील सेवा निलयम संस्थेतर्फे भुकेलेल्यांना भोजन देऊन त्यांची पोटाची भूक भागविण्याचा उपक्रम गेली पाच वर्षे राबविला आहे. सोमवारीही (दि. १ मार्च) सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत त्यांनी हा रोटी डे उपक्रम राबवितांना रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, वटेश्वर मंदिर परिसरातील फिरस्ते, गरजू प्रवासी यांना शोधून त्यांना चपाती, मटकीची उसळं, मसाला भात असे भोजन देऊन त्यांची भूक भागविली.
अशा पद्धतीने सुमारे ३००हून अधिक गरजूंना या रोटी डेचा आधार मिळाला. सेवा निलयम या संस्थेच्या माध्यमातून ऐश्वर्या मुनीश्वर, राजकुंवर घाटगे, मयुरी उरसाल, दीपाली शिंदे, महेश उरसाल, सई उरसाल, राहुल गोंदिल, सुजीत साळोखे, सुहास खुडे, अमित देशपांडे, कृष्णात दांडगे, अमर पोवार, सुरज केसरकर, सौरभ कापडी यांनी हा उपक्रम राबवला.