निराधारांचा आधार- दृष्टीक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:51 AM2018-04-10T00:51:17+5:302018-04-10T00:54:27+5:30
चंद्रकांत कित्तुरे
भूक एक अशी गोष्ट आहे की, जी आयुष्यभर आपली पाठ सोडत नाही. ती कशाचीही असू शकते. मग ती अन्नाची असेल, शिक्षणाची असेल, पैशाची असेल, यशाची असेल. ही भूक भागविण्यासाठी माणूस आयुष्यभर कष्ट करीत असतो. पैसा असेल तर सर्व काही मिळविता येते असा एक आपला सर्वसाधारण समज असतो. म्हणूनच आपण पैशाच्या पाठीमागे लागलेले असतो. पोटाची भूक भागविण्यासाठी आपल्याला अन्न लागते. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत. त्या भागल्या की माणसाला अन्य प्रकारची भूक भागविण्यासाठी प्रयत्न करता येतात, पण त्याच भागल्या नाहीत तर जगायचे कसे हाच त्याच्यापुढचा सर्वांत मोठा प्रश्न असतो. कुपोषण, भूकबळी यांसारखे प्रश्न त्यामुळेच खूप गंभीर आहेत. आपल्याकडे कुपोषणचा प्रश्न मोठा नसला तरी गरीब-श्रीमंत ही दरी मोठी आहेच. अनेकांच्या घरी दोनवेळचे खायचे वांदे असतात. अशावेळी घरात, कुटुंबात वाद होतात. पुरुषमंडळी व्यसनाच्या आहारी जाऊ शकतात. यामुळे त्या कुटुबांचे स्वास्थ्यच हरवून जाते. अशा अनेक घरांंमध्ये वृद्ध आई-वडील किंवा काही काम न करणारे कोणी असेल तर ते घरात नकोसे वाटतात. यातून होणाऱ्या भांडणातून एकतर आई-वडील घराबाहेर पडतात किंवा मुले. त्याचप्रमाणे मनोरुग्ण, संतती नसलेले ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य काही कारणांमुळेही एकाकी जीवन कंठणारे नागरिक एकप्रकारे निराधारच बनलेले असतात. ते आधार आणि मायेच्या शोधात असतात. अशा निराधारांना आधार देणारेही अनेकजण समाजात आहेत. कुणी व्यक्तिगत पातळीवर, तर कुणी संघटनात्मक पातळीवर असा आधार देत असतात. अशीच एक संस्था जयसिंगपूर येथे २०१४ पासून कार्यरत आहे. जयसिंगपूर युवा फौंडेशन तिचे नाव. जयसिंगपूर शहराला भूकमुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्नशील आहे. अझहर पटेल व त्यांच्या काही मित्रांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या विचाराने एकत्र येऊन ही संस्था स्थापन केली. काय करावयाचे याचा विचार करत असताना निराधार, असाहाय्य बनलेल्यांचा आधार बनण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी पहिले पाऊल म्हणून असे लोक शोधून त्यांना दोनवेळचे जेवण घरपोच देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. काटेकोर निकष लावून जे गरजू आहेत त्यांनाच याचा लाभ मिळेल अशी व्यवस्था त्यांनी केली. ४ एप्रिल २०१४ रोजी त्यांनी या उपक्रमाचा प्रारंभ केला. सुरुवातीला स्वत:च्या खिशातून पैसे घातले. त्यांचे हे कार्य पाहून शहरातील उद्योजक, दानशूर व्यक्तींनीही या उपक्रमासाठी मदतीचा हात देण्यास सुरुवात केली. त्यामुळे उत्साह वाढलेल्या या तरुणांनी या निराधारांच्या आरोग्याची काळजी वाहण्याचे ठरवले. त्यासाठी खास एका डॉक्टरची नेमणूक केली. महिन्यातून एकदा त्यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचारही मोफत करण्यास सुरुवात केली. याशिवाय कपडेही दिले जातात. सध्या ५० हून अधिक अशा असाहाय्य, निराधारांचा आधार ही संस्था बनलेली आहे. यंदा ४ एप्रिलपासून ५० हून अधिक लोकांना सकाळचा चहा, नाष्टाही घरपोच देण्यास सुरुवात केली आहे. कनकभाई शहा आणि भाऊसाहेब नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या संस्थेच्या कार्यात अझहर यांना निखिल कुंभार, अमर पाटील, सचिन मोठे, समर पाटील, जुनेद गवंडी, चेतन माने, अक्षय परुळेकर, हेमंत जाधव, शंभू हजारे, मनोज शिंदे, रोहित साळुंखे, मुकुंद हजारे, पूनम पाटील, सोनल पटेल आदींची साथ आहे. हे सर्वजण मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. व्यवसाय, नोकरी सांभाळून हे कार्य ते करीत आहेत. निराधारांचा आधार बनले आहेत. जयसिंगपूर ९५ टक्के तरी भूकमुक्त झाले असल्याचा दावा अझहर पटेल करतात. भविष्यात परिसरातील गावांमध्येही हा उपक्रम सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचे हे कार्य इतरांसाठी अनुकरणीय आहे. (लेखक ‘लोकमत’चे उपवृत्त संपादक आहेत.kollokmatpratisad@gmail.com )