मंत्र्यांच्या आदेशाला सहकार विभागाकडून केराची टोपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:23 AM2021-02-13T04:23:00+5:302021-02-13T04:23:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जनता बझारमध्ये चाललेल्या मनमानी कारभाराची चौकशी करून अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश सहकार मंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जनता बझारमध्ये चाललेल्या मनमानी कारभाराची चौकशी करून अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सहकार विभागाला दिले होते. मात्र, या विभागाने मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सत्ताधारी मंडळींच्या मनमानी कारभाराला खतपाणी घातल्याचा आरोप जनता बझारचे संचालक डॉ. सुहास बोंद्रे, रविकिरण चौगुले, वैभव पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
जनता बझारमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार करूनही गेले सहा महिने शहर उपनिबंधकांकडून कागदी घोडे नाचवले जात आहेत. याप्रकरणी चौकशीला टाळाटाळ केली जात असून, सहकार विभागाने आदेश देऊनही एखादी संस्था कागदपत्रे का देत नाही? यामागे नेमके गौडबंगाल काय आहे? सत्ता टिकवण्यासाठी संचालकांनी चालवलेला हा खेळ असून, हे खपवून घेणार नसल्याचे सुहास बोंद्रे यांनी सांगितले. संस्थेच्या कारभारावर अंकुश राहावा, यासाठी चेक कमिटीची स्थापना केली, मात्र कारभाऱ्यांना मनमानी करता येईना, म्हणून ही कमिटी परस्पर बरखास्त करण्यात आली. शासकीय देणी ४० लाखांची असताना व्यापाऱ्यांची देणी देण्याची गडबड कारभाऱ्यांना का झाली? असा सवालही रविकिरण चौगुले यांनी केला.