कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणारा बास्केट ब्रिज दोन वर्षात पूर्ण होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 06:40 PM2023-02-01T18:40:09+5:302023-02-01T18:42:08+5:30
महापुरामुळे शहराचा संपर्क तुटू नये यासाठी या ब्रीजची उभारणी
सतीश पाटील
शिरोली : पुणे-बंगळुरू महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे होणाऱ्या बास्केट ब्रिजमुळे कोल्हापूरच्या सौंदर्यात भर पडणार असून हा ब्रिज दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा या ब्रिजचे काम मिळालेल्या रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लि. या कंपनीने केला आहे.
या बास्केट ब्रिजच्या कामाचा पायाभरणी शुभारंभ नुकताच शनिवारी (दि.२८) रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिरोली सांगली फाटा येथे झाला आहे. या ब्रिजचे काम पुणे येथील रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा लि. या कंपनीला मिळाले आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथून पूर्वेकडील सेवा मार्गावरुन शहरात येण्यासाठी या बास्केट ब्रिजची सुरुवात होणार आहे.
१३०० मीटर बास्केट ब्रिजची लांबी असून या ब्रिजचे दुसरे टोक शिरोली जकात नाका इथे असणार आहे. या ब्रिजसाठी सुमारे १८० कोटी निधी प्रस्तावित असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. महापुरामुळे शहराचा संपर्क तुटू नये यासाठी या ब्रीजची उभारणी करण्यात येणार आहे. या ब्रीजमुळे वाहतूक कोंडीची समस्याही सुटणार आहे. विशेष म्हणजे महापूर काळात पुणे-बंगळूरू महामार्ग बंद होतो. मात्र, हा ब्रीज उभारल्यानंतर महापूर काळातही पुणे-बंगळूरू महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु राहणार आहे.
शिरोली सांगली फाटा ते शिरोली जकात नाका पर्यंत १३०० मीटर चा बास्केट ब्रिज होणार आहे. याचे काम रोडवे सोल्युशन इंडिया इंन्फ्रा.लि कंपनीला मिळाले असून हा बास्केट ब्रिज २ वर्षात पूर्ण होणार आहे. - वैभवराज पाटील, प्रकल्प व्यवस्थापक, रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रा.लि.
कोल्हापूरच्या सौदर्यात भर घालणारा आणि महापुरामुळे शहराचा संपर्क तुटू नये यासाठी बास्केट ब्रिज होणार आहे. ब्रिज पूर्ण झाल्यानंतर जरी पंचगंगा नदीला पुर आला तरी शहराचा संपर्क तुटणार नाही. तसेच वाहतूक कोंडी सुद्धा होणार नाही. -वसंत पंदरकर - राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिकारी.