बटालियन अन्य जिल्ह्यांत हलविणार
By Admin | Published: December 30, 2015 01:09 AM2015-12-30T01:09:28+5:302015-12-30T01:09:58+5:30
संदीप बिष्णोर्ई : ‘भारत राखीव बटालियन’ला जागा देण्यास रेंदाळ, दिंडनेर्ली ग्रामस्थांचा विरोध, बैठक निष्फळ
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता ‘भारत राखीव बटालियन ३’च्या प्रशासनाने रेंदाळ (ता. हातकणंगले) व दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील २०० पैकी ७५ एकर जागेची मागणी केली आहे. या जागेसंदर्भात राज्य राखीव बटालियनचे अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई यांनी मंगळवारी रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी ग्रामस्थांनी बटालियनला जागा देण्यास तीव्र विरोध केल्याने बिष्णोई यांची अंतिम बैठक निष्फळ ठरली. जागेअभावी ही बटालियन अन्य जिल्ह्यांत हलविण्याचा निर्णय आता भारत राखीव बटालियनच्या प्रशासनाने घेतला असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्य राखीव पोलीस बल गटाचा राज्यात तसेच राज्याबाहेरही आपत्कालीन तसेच संवेदनशील परिस्थितीमध्ये जीवित व वित्तहानी टाळणे, सरकारी व खासगी मालमत्तेचे संरक्षण तसेच सुरक्षिततेकरिता वापर केला जातो. या बटालियनचा मुक्काम सध्या दौंड (जि. पुणे) येथे आहे. बटालियनचे मुख्यालय बांधण्याचे नियोजन २०११-१२ मध्ये करण्यात आले. त्यानुसार प्रथमत: मजले (ता. हातकणंगले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करून सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ती सध्या ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर आहे; परंतु मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून तमदलगे जागेत ‘पूर्णत: वनसंज्ञा’ लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचण निर्माण होऊन मुख्यालय उभारणीस उशीर होत आहे. यासाठी रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार बटालियनच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामध्ये प्राधान्याने २०० पैकी ७५ एकर जागेची मागणी केली आहे. परंतु दोन्ही गावांतील ग्रामस्थांनी बटालियनला जागा देण्यास विरोध केला होता.
दरम्यान, या जागेसंदर्भात अंतिम चर्चा करण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई मंगळवारी सकाळी कोल्हापुरात आले. त्यांनी पोलीस मुख्यालयाच्या बटालियनच्या कार्यालयात रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांशी चर्चा करून जागा देण्यासंदर्भात विनंती केली. यावेळी दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी त्यांची विनंती झिडकारून बटालियनला जागा देण्यास विरोध असल्याचे सांगितले. तसेच रेंदाळ हे भविष्यात नगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार आहे. येथील लोक भूमिहीन झाले आहेत. अनेक गिरण्यांनी ही जागा व्यापली आहे. बटालियनला जागा दिल्यास गावाचे कार्यक्षेत्र संपुष्टात येणार आहे. पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे , बटालियनचे समादेशक रा. बा. केंडे व अधिकारी उपस्थित होते.
जागेचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात
रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांनी भारत राखीव बटालियनला जागा देण्यास शेवटपर्यंत विरोध असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बटालियन प्रशासनाकडून आता जिल्ह्णात कोठेही शासकीय गायरानामधील जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली जाणार आहे. त्यांनी यामध्ये मार्ग काढला नाही तर ही बटालियन जेथे जागा उपलब्ध होईल त्या जिल्ह्णात हलविण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक बिष्णोई यांनी यावेळी सांगितले.
रेंदाळ व दिंडनेर्ली ग्रामस्थांना बटालियनचे मुख्यालय बांधल्यानंतर गावाला त्याचा काय फायदा होणार, हे सांगितले होते; परंतु त्यांनी बटालियनला जागाच द्यायची नाही, असे सांगितले. त्यांना ‘शेवटची संधी देतो, तुमचा निर्णय विचार करून सांगा,’ अशी विनंतीही केली होती; परंतु त्यांनी शेवटपर्यंत विरोध केला. आता कोल्हापुरात जागा उपलब्ध होत नसेल तर राज्यात अन्यत्र ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल, तिथे ही बटालियन हलविण्यात येईल.
संदीप बिष्णोई, अप्पर पोलीस महासंचालक,
राज्य राखीव पोलीस बल