कळंबा जेलमध्ये पुन्हा मोबाईल फोनसह बॅटऱ्या सापडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:20 PM2021-01-02T12:20:05+5:302021-01-02T12:21:39+5:30
Crimenews Jail Kolhapur- गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी झडतीदरम्यान उंबराच्या झाडाखाली बिस्किटाच्या पाकिटात लपवून ठेवलेला मोबाईल व तीन बॅटऱ्या सापडल्या.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी झडतीदरम्यान उंबराच्या झाडाखाली बिस्किटाच्या पाकिटात लपवून ठेवलेला मोबाईल व तीन बॅटऱ्या सापडल्या.
याबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात कैद्यांविरोधात गुन्हा नोंद झाला. याप्रकरणी कारागृह अधिकारी राकेश अभिमान देवरे (वय ३५, रा. अधिकारी निवासस्थान, कळंबा) यांनी फिर्याद दिली. आतापर्यंत या कारागृहात १२ मोबाईल व ११ बॅटऱ्या सापडल्या आहेत.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सर्कल क्रमांक सातसमोरील परिसराची झडती घेण्यात आली. यात उंबराच्या झाडाजवळ लाल रंगाच्या बिस्किटाच्या पाकिटात एक मोबाईल, तीन मोबाईल फोनच्या बॅटऱ्या अज्ञात कैद्याने ठेवल्याचे मिळून आले.
हा कारागृह प्रशासनाने दिलेल्या आदेशाचा भंग करून कारागृह सुरक्षिततेला धोका पोहोचविण्याचे काम केले आहे, अशी फिर्याद तुरुंग अधिकारी देवरे यांनी दिली. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल वाय. बी. पारळे, बजरंग लाड करीत आहेत.
सुरक्षा भेदून मोबाईल करागृहात
कारागृहाची सुरक्षा भेदून कैदी चक्क अतिसुरक्षा विभागापर्यंत मोबाईल व बॅटऱ्या नेत आहेत. ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेच्या कारणावरून गेल्याच आठवड्यात कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तरीही मोबाईल आत नेणे बंद झालेले नाही. त्यामुळे एवढे मोबाईल आत जातात कसे व त्यांना रोखायचे कसे, हेच कारागृह प्रशासनासमोर आव्हान बनले आहे.