आजऱ्यातील २६ ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:04 PM2020-11-28T15:04:56+5:302020-11-28T15:10:12+5:30
grampanchyat, elecation, kolhapurnews आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही झालेले नाही. तरीही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणशिंग फुंकले आहे. प्रभागनिहाय मतदारयादी १ डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून हरकतीनंतर १० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
सदाशिव मोरे
आजरा : आजरा तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सरपंचपदाचे आरक्षण अद्यापही झालेले नाही. तरीही इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून रणशिंग फुंकले आहे. प्रभागनिहाय मतदारयादी १ डिसेंबरला प्रसिद्ध होणार असून हरकतीनंतर १० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. १५ जानेवारीपर्यंत ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुका या २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहेत. ग्रामपंचायतीचा सदस्यापासून सरपंचपदाची संधी आपल्यालाच मिळावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दिवाळीत घरोघरी जावून शुभेच्छा देणे, फराळाचे वाटप करणे, रेशनकार्डपासून ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र देणे, शेतीच्या बांधावरून झालेली भांडणे मिटविणे त्यामधून विरोधकांचा काटा काढणे हे प्रकार सुरू आहेत.
सरपंचपदासाठी इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून गावातून फिरणेस सुरूवात केली आहे. आपलप्या गटाच्या लोकांना एकत्रित करून आश्वासनांचे डोंगर उभे केले जात आहेत. जेवणावळी सुरू आहेत. तालुक्याच्या नेत्यांजवळी आपल्यालाच सरपंचपद मिळणेसाठी बेरजेचे आडाखे बांधले जात आहेत.
महागोंड, मुमेवाडी, चव्हाणवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, बेलेवाडी, हालेवाडी, चिमणे, गवसे, देवर्डे, एरंडोळ, देवकांडगाव, हाळोली, हत्तीवडे, होनेवाडी, कासारकांडगाव, मुरूडे, सुळे, निंगुडगे, सरोळी, किणे, मलिग्रे, शिरसंगी, वाटंगी, पेद्रेवाडी या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत.
२६ ग्रामपंचायतींचे ७८ प्रभाग असून २०६ सदस्य निवडले जाणार आहेत. १० डिसेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे. १५ डिसेंबरपासून निवडणुकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होणार आहे. नवीन वर्षात १५ जानेवारीपूर्वी ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.