हातकणंगलेत वर्चस्वाची लढाई

By admin | Published: February 1, 2017 11:55 PM2017-02-01T23:55:53+5:302017-02-01T23:55:53+5:30

१७ गावांतील दहा मतदारसंघांमध्ये प्रतिष्ठा : आवाडे, आवळे, हाळवणकर, मिणचेकर आमने-सामने

Battle of Armadangle | हातकणंगलेत वर्चस्वाची लढाई

हातकणंगलेत वर्चस्वाची लढाई

Next

इचलकरंजी : येथील विधानसभेच्या आजी-माजी मतदारसंघात असणाऱ्या १७ गावांमध्ये कॉँग्रेसमधील आवाडे व आवळे गट आणि आमदार हाळवणकर व आमदार मिणचेकर यांचा राजकीय प्रभाव आहे. या गावांमध्ये जिल्हा परिषदेचे पाच व तालुका पंचायतीचे दहा मतदारसंघ असून, थोड्या फार फरकाने चारही गट येथे कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीमध्ये आमदार सुरेश हाळवणकर, आमदार सुजित मिणचेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हातकणंगले तालुक्यातील या ग्रामीण भागात चौघेही वर्चस्वासाठी लढतील, असा जाणकारांचा व्होरा आहे.
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये सन २००९ पर्यंत शहर वगळता तारदाळ, खोतवाडी, कोरोची, कबनूर, तिळवणी, साजणी, माणगाव, माणगाववाडी, चंदूर, रेंदाळ, रांगोळी, जंगमवाडी, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली, तळंदगे व यळगुड अशी १७ गावे होती. त्यानंतर झालेल्या पुनर्रचनेत इचलकरंजी व चंदूर, कबनूर, कोरोची, खोतवाडी, तारदाळ या गावांचा विधानसभा मतदारसंघ झाला. या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये इचलकरंजी व वडगाव या दोन्ही मतदारसंघांत त्यावेळी असलेले विधानसभा सदस्य प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे या दोघांनाही पराभव पत्करावा लागला. वडगावमध्ये डॉ. सुजित मिणचेकर व इचलकरंजीमध्ये सुरेश हाळवणकर निवडून आले.
अशा या १७ गावांमध्ये आवाडे, आवळे, हाळवणकर व मिणचेकर या चौघांनाही मानणारे त्यांचे समर्थक आहेत. त्यामुळे या चौघांच्या गटाचे अस्तित्व त्या ठिकाणी आहे. या १७ गावांत जिल्हा परिषदेचे पाच व तालुका पंचायत समितीचे दहा मतदारसंघ आहेत. मात्र, इचलकरंजी शहराच्या प्रभावामुळे आणि जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून या १७ गावांत माजी मंत्री आवाडे व आमदार हाळवणकर यांचे गट ताकदीचे मानले जातात.
ग्रामीण परिसरामध्ये कॉँग्रेसला गळती लागली असून, अनेक लहान-मोठे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागात कॉँग्रेसचा प्रभाव कमी होत असून, भाजपचा प्रभाव म्हणजेच पर्यायाने आमदार हाळवणकरांचा प्रभाव वाढत असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे. आता प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. कॉँग्रेसकडून आवाडे गटाच्या समर्थकांना उमेदवारी मिळाली नाही, तर एका आघाडीची नोंदणी केली आहे आणि या आघाडीच्या अधिपत्याखाली या
१७ गावांत आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुद्धा आवाडे गटाने केली असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून आणि आपल्या गटाचे अस्तित्व टिकविण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये आवाडे, हाळवणकर, आवळे व मिणचेकर या चारही गटांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Battle of Armadangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.