गोकुळचे रणांगण : शाहू आघाडीकडे गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 01:23 PM2021-03-25T13:23:21+5:302021-03-25T13:25:20+5:30
GokulMilk Elecation Kolhapur-गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी आकारास आलेल्या राजर्षी शाहू आघाडीकडे नेत्यांच्या मांदियाळीसह उमेदवारीसाठी गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शाहू आघाडीसोबत आहे, म्हणून निरोप दिलेले नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात असून त्यांच्याशी आणखी काहीजण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.
कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी आकारास आलेल्या राजर्षी शाहू आघाडीकडे नेत्यांच्या मांदियाळीसह उमेदवारीसाठी गर्दी वाढल्याने इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. शाहू आघाडीसोबत आहे, म्हणून निरोप दिलेले नेते सत्तारूढ गटाच्या संपर्कात असून त्यांच्याशी आणखी काहीजण स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत.
गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया जशी सुरू होईल, तशी आघाड्यांमधील रंगत वाढत आहे. सत्तारूढ गटातील संचालक आपल्याकडे वळवत राजर्षी शाहू आघाडीने निवडणूक एकतर्फी असल्याची हवा तयार केली. मात्र, सत्तारूढ गटाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत आघाडीतील हवा काढण्याची व्यूहरचना आखली आहे. त्यानुसार आपण शाहू आघाडीसोबत आहे, असा पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निरोप देऊन गेलेले दोन नेते अस्वस्थ आहेत.
दुसऱ्या नेत्याने जिल्हा बँकेचे राजकारण सोडवून घेण्यासाठी अट घातल्याचे समजते. त्यानुसार तेथील दुसऱ्या गटाची सगळी ताकद बँकेच्या निवडणुकीत लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेली पाच वर्षे विरोधी आघाडीसोबत असणाऱ्या एका माजी संचालकानेही सत्तारूढ गटाशी संपर्क साधला आहे.
राजू आवळेंसह, मिणचेकर, स्वरूपा यड्रावकर इच्छुक
महाविकास आघाडीकडून अनुसूचित जाती गटातून आमदार राजू आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर हे इच्छुक आहेत. महिला गटातून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या पत्नी स्वरूपा पाटील-यड्रावकर यांचेही नाव पुढे येत आहे. जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांच्याही नावाची चर्चा सुरू असून गेल्या चार वर्षांत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांचा चांगला संपर्क असून विशेष म्हणजे ते सर्वाधिक मते असलेल्या करवीर तालुक्यातील आहेत.