जिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:52 PM2020-01-29T12:52:00+5:302020-01-29T12:52:54+5:30

आता ‘गोकुळ’नंतरच जिल्हा बॅँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. नेत्यांना, विशेष करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोकळीक मिळणार असल्याने ‘गोकुळ’चे रणांगण चांगलेच तापणार आहे.

The battle for 'Gokul' will heat up due to the district bank elections | जिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणार

जिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणार

Next
ठळक मुद्देजिल्हा बॅँकेची निवडणूक लांबल्याने ‘गोकुळ’चे रणांगण तापणारराष्ट्रवादीच्या बचावात्मक भूमिकेला मोकळीक मिळणार

कोल्हापूर : राज्य सरकारने जिल्हा बॅँकांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची निवडणूक प्रक्रिया थांबली आहे. ‘गोकुळ’बरोबर जिल्हा बॅँकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याने नेत्यांची गोची झाली होती. मात्र आता ‘गोकुळ’नंतरच जिल्हा बॅँकेची रणधुमाळी सुरू होणार आहे. नेत्यांना, विशेष करून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांना मोकळीक मिळणार असल्याने ‘गोकुळ’चे रणांगण चांगलेच तापणार आहे.

‘गोकुळ’ व जिल्हा बॅँक या दोन संस्था जिल्ह्याच्या शिखर संस्था आहेत. येथे सत्ता मिळविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांत चढाओढ असते. ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाची मुदत एप्रिलच्या शेवटच्या, तर जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची मुदत मेच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे. त्यामुळे दोन्ही संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू होत असल्याने राजकीय नेत्यांची कोंडी होते.

सध्या जिल्हा बॅँकेची ठराव संकलित करण्याची प्रक्रिया थांबणार आहे. साधारणत: २७ एप्रिलनंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे. तोपर्यंत म्हणजेच साधारणत: १३ एप्रिलला ‘गोकुळ’चे मतदान होण्याची शक्यता आहे.

‘गोकुळ’च्या राजकारणाचे पडसाद जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीवर पडतात. त्यामुळे राष्ट्रवादी  कॉँग्रेस ‘गोकुळ’च्या निवडणुकीत बचावात्मक भूमिका घेते. या वेळेलाही राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा. त्या बदल्यात जिल्हा बॅँकेत सहकार्य करू, अशी भूमिका आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांनी घेतली आहे. तसा प्रस्ताव ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनाही दिल्याची चर्चा आहे.

इकडे पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक यांना जवळ घ्यायचे की आमदार पी. एन. पाटील व महादेवराव महाडिक यांना सोबत घेऊन जिल्हा बॅँकेचे राजकारण सोपे करायचे, अशी गोची मंत्री हसन मुश्रीफ यांची झाली आहे.

तीच अडचण राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील व आमदार राजेश पाटील यांची आहे. त्यानुसार राष्ट्रवादीमध्ये सावध हालचाली सुरू आहेत. आता जिल्हा बॅँकेची निवडणूक पुढे गेल्याने या नेत्यांना मोकळीक मिळणार आहे.

तीन महिने पुढे प्रक्रिया गेली तरी प्रत्यक्षात निवडणूक सहा महिन्यांनी होणार आहे. तोपर्यंत ‘गोकुळ’चे राजकारण शांत होईल आणि बॅँकेची निवडणूक सोपी जाईल, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करील.

जिल्हा बॅँकेची निवडणूक आॅक्टोबरमध्ये शक्य

सरकारने २७ एप्रिलपर्यंत निवडणूक लांबणीवर टाकली आहे. मात्र त्यानंतर प्रक्रिया सुरू करून निवडणुका होईपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे पावसाळ्याचे कारण पुढे करीत निवडणुकांना मुदतवाढ मिळू शकते. परिणामी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्येच बॅँकेची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे.
 

 

Web Title: The battle for 'Gokul' will heat up due to the district bank elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.