‘कोजिमाशि’चे रणांगण : सत्तारुढ-विरोधकांची प्रतिष्ठा पणाला

By admin | Published: February 9, 2015 12:19 AM2015-02-09T00:19:29+5:302015-02-09T00:37:04+5:30

स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी बाजी मारली होती पण सभासदांनी दिलेली एकहाती सत्ता राखण्यात सत्तारुढ गट अपयशी ठरला.

Battle of Kojimashi: The ruling-opponents' reputation will be respected | ‘कोजिमाशि’चे रणांगण : सत्तारुढ-विरोधकांची प्रतिष्ठा पणाला

‘कोजिमाशि’चे रणांगण : सत्तारुढ-विरोधकांची प्रतिष्ठा पणाला

Next

राजाराम लोंढे-कोल्हापूर -कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेसाठी (कोजिमाशि) सरांचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्तारुढ गटाला रोखण्यासाठी विरोधकांनी एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न केला असला तरी जागावाटपाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे. सत्तारुढ व विरोधकांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणूक रंगतदार होणार हे निश्चित आहे. ‘कोजिमाशि’ ही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची शिखरसंस्था आहे. या संस्थेची निवडणूक जिल्ह्यात नेहमीच चर्चेचा विषय ठरते. मागील निवडणुकीत स्वाभिमानी आघाडी, राजर्षी शाहू आघाडी व परिवर्तन आघाडी अशी तिरंगी लढत झाली होती. स्वाभिमानी आघाडीने एकतर्फी बाजी मारली होती पण सभासदांनी दिलेली एकहाती सत्ता राखण्यात सत्तारुढ गट अपयशी ठरला. संचालक मंडळातील अंतर्गत धुसफुसीमुळे सत्तारुढ गटात उभी फूट पडली आणि तेथूनच प्रत्येक निर्णयाला विरोध होऊ लागला. प्रमुख विरोधक शांत असताना सत्तारुढ गट एकमेकांविरोधात न्यायालयापर्यंत गेला. विरोधी परिवर्तन आघाडीचे राजेंद्र रानमाळे यांनी शाहू आघाडीशी जुळवून घेत शाहू-परिवर्तन आघाडीची मोट बांधली. सत्तारुढ गटातून प्रा. जयंत आसगांवकर व बाबा पाटील हे बाहेर पडल्याने सत्तारुढ गटाची ताकद विभागली आहे. काही करून सत्तारुढ गटाला रोखण्यासाठी रानमाळे यांचा विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याचा प्रयत्न आहे.
शाहू परिवर्तन आघाडीमध्ये प्रा. आसगांवकर व बाबा पाटील यांना बरोबर घेऊन ‘एकास एक’ असे तगडे आव्हान सत्तारुढ गटासमोर उभे करण्यासाठी रानमाळे प्रयत्नशील आहेत पण त्यामध्ये त्यांना कितपत यश येते हे महत्त्वाचे आहे. इच्छुकांची संख्या व जागावाटपाचा तिढा सोडवताना रानमाळे यांना कसरत करावी लागणार आहे.
सत्तारुढ गटात फूट पडल्याने दादासाहेब लाड यांना यावेळी ही निवडणूक तशी सोपी राहिलेली नाही पण गेले दोन वर्षे विरोधकांची खेळी ओळखून, ‘एकास एक’ आव्हान गृहीत धरूनच त्यांनी जिल्ह्णातील शाळांची गोळाबेरीज सुरू केली आहे. पण त्यांना पॅनेल बांधताना भाकरी परतून नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागणार आहे. हीच सध्याची राजकीय परिस्थिती आहे.
प्रा. आसगांवकर व बाबा पाटील यांनी सत्तारुढ गटातून बाजूला होत सवता सुभा मांडला आहे. ‘लोकशाही आघाडी’च्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. विनाअनुदानित शाळा हे या आघाडीची मुख्य सामर्थ्य असून सत्तारुढ गटातून बाजूला होऊन त्यांच्या कारभारावर थेट हल्ला चढविला ही त्यांची जमेची बाजू आहे. तिन्ही गटांची तयारी पाहता सध्या तरी तिरंगी लढतीचे चित्र दिसत असले तरी शेवटच्या क्षणी एकास एक लढत देण्याचा प्रयत्नही होऊ शकतो.


आज होणार प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध
‘कोजिमाशि’ची प्रारुप मतदार यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर या यादीवर दहा दिवसांत हरकती घेण्यास मुदत आहे. त्यामुळे साधारणत: एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकते.

Web Title: Battle of Kojimashi: The ruling-opponents' reputation will be respected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.