राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई

By admin | Published: February 11, 2017 12:40 AM2017-02-11T00:40:15+5:302017-02-11T00:40:15+5:30

सोयीचे, कुरघोडीचे राजकारण नडले : गतवेळचे संख्याबळ गाठताना उडणार दमछाक

The battle for NCP's existence | राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई

राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई

Next

राजाराम लोंढे ---कोल्हापूर --एकेकाळी जिल्ह्यातील सर्वच सत्ताकेंद्रे ताब्यात असणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेसची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अस्तित्वासाठी लढाई सुरू आहे. नेत्यांचे सोयीचे राजकारण व अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकल्याने ताकदवान घड्याळाची टिकटिक बंद पडते की काय, अशी भीती कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. चार तालुक्यांतच ताकद असणाऱ्या राष्ट्रवादीची गतवेळचे १६ हे संख्याबळ गाठताना पुरती दमछाक उडणार आहे.
कॉँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांच्या पाठीशी कोल्हापूर जिल्हा खंबीरपणे उभा राहिला. त्यामुळेच १९९९ ला पक्षाचे आयुष्य जेमतेम १४ दिवसांचे असतानाही या जिल्ह्यातील जनतेने पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवून पाच चिन्हांवर, तर दोन पुरस्कृत आमदार व दोन खासदार निवडून दिले. दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक, दिग्विजय खानविलकर, बाबासाहेब कुपेकर व निवेदिता माने यांनी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ‘घड्याळ’ पोहोचविले. त्यानंतर २००२ मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या. २००४ लाही पक्षाचे चार व एक पुरस्कृत आमदार व दोन खासदार निवडून आले. या कालावधीत तुलनात्मकदृष्ट्या पक्षाची काहीशी पडझड झाली असली तरी नेत्यांनी दुरुस्त्या केल्याने पुन्हा जिल्हा परिषदेवर सत्ता आणलीच; पण त्याबरोबर जिल्हा बॅँक, बाजार समितीसह बहुतांश साखर कारखाने ताब्यात ठेवण्यात यश मिळविले; पण २००९ नंतर खऱ्या अर्थाने पक्षाला घरघर लागली. मंडलिक-मुश्रीफ यांचा वाद, खानविलकर पक्षापासून दूर गेले, निवेदिता माने यांचा पराभव या सगळ्यांची पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली. सध्या पक्षाची अवस्था फारच केविलवाणी झाली आहे. ‘नंबर वन’ असणाऱ्या पक्षाला चिन्हावर कसेबसे ३८ उमेदवार उभे करता आले; त्यासाठीही पुरती दमछाक झाली. त्यातील करवीर, गगनबावडा, हातकणंगलेमधील जागा अक्षरश: ओढून-ताणूनच उभ्या केल्या आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत पक्षातून वजाबाकीच मोठ्या प्रमाणात झाली आहे. भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीलाच बसला. गोपाळराव पाटील, अशोक चराटी, बाळासाहेब नवणे, पी. जी. शिंदे, अरुण इंगवले, विठ्ठलराव नाईक, अशोक माने, धनाजी जगदाळे, रामचंद्र डांगे यांनी पक्षाला राम-राम करीत भाजपमध्ये, तर संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. धैर्यशील माने यांनी भाजपशी, तर मानसिंगराव गायकवाड यांनी शिवसेनेशी जवळीक केली आहे. ‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, रणजितसिंह पाटील, राजेखान जमादार या मंडळींनीही पक्षाचा नाद सोडला. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी एकहाती सत्ता स्थापन करील, असे म्हणणे काहीसे धाडसाचे होईल; पण गतवेळेचा १६चा आकडा गाठताना त्यांची दमछाक उडणार आहे.


हसन मुश्रीफ यांनी धनंजय महाडिक यांना ताकदीने निवडून आणले; पण महाडिक यांच्या सर्वपक्षीय राजकारणामुळे या दोघांतील मतभेदाची दरी वाढली. त्यात महाडिक यांनी महापालिका व नगरपालिका निवडणुकीत भाजप-ताराराणीला उघड मदत केल्याचा राग मुश्रीफ यांच्या मनात आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोरच त्यांनी महाडिक यांच्याशी मतभेद असल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेसाठी ‘दक्षिण’मध्ये राष्ट्रवादी-भाजप आघाडीसाठी महाडिक आग्रही होते, पण त्याला मुश्रीफ यांनी विरोध केल्याने त्यांनी या निवडणुकीपासून अंगच काढून घेतले.


चंदगडमधून ‘घड्याळ’ गायब
चंदगडमध्ये पक्षाच्या आमदार असतानाही येथे पक्षाचे चिन्हच गायब झाले आहे. येथे आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी भाजपशी आघाडी केली असून, त्या माध्यमातून दोन जागा लढत आहेत.

जिल्हा बॅँक, बाजार समितीत सूज!
जिल्हा बॅँक व बाजार समितीच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडे सत्ताकेंद्रे दिसतात; पण येथील संचालकांचे बलाबल पाहिले तर सत्तेची सूज दिसते. मागील सभागृहांपेक्षा निम्मेही संचालक पक्षाचे नाहीत.

मावळत्या सभागृहात राष्ट्रवादीचे बळ :
गडहिंग्लज- ५, राधानगरी - ३, आजरा- २, हातकणंगले - २, भुदरगड - १,चंदगड- १, शिरोळ- १, गगनबावडा- १. करवीर, पन्हाळा, कागल, शाहूवाडी तालुक्यांत एकही जागा जिकंता आली नव्हती.

Web Title: The battle for NCP's existence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.