वाठारमध्ये तरुण नेतृत्वाची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:39+5:302021-01-10T04:17:39+5:30
तिन्ही पॅनेलमध्ये तरुणांना संधी : ज्येष्ठ नेते मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिलीप चरणे /लोकमत न्यूज नेटवर्क नवे पारगाव : वाठार ...
तिन्ही पॅनेलमध्ये तरुणांना संधी : ज्येष्ठ नेते मार्गदर्शकाच्या भूमिकेत
दिलीप चरणे /लोकमत न्यूज नेटवर्क
नवे पारगाव : वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे प्रमुख गटांमध्ये तुल्यबळ तिरंगी लढत होत आहे. प्रमुख गटांच्या नेत्यांनी घेतलेल्या सोयीस्कर उड्यांमुळे नेमका कौल कोणाला मिळतो याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यावेळी सर्वच गटांनी बहुतांश युवकांना संधी दिल्यामुळे ही निवडणूक तरुण नेतृत्वाची लढाई ठरत आहे.
वाठारमधील राजकारण कुंभार गट, गणेश ग्रुप, इक्बाल शेख गट, महेंद्र शिंदे यांचा जय हनुमान युवाशक्ती गट, शिवशक्ती ग्रुप, मातोश्री ग्रुप, वाठार विकास आघाडी अशा गटांमध्ये विभागलेले आहे. याआधी हे गट आपापली ताकद दाखविण्यासाठी वेगवेगळे लढत होते. त्यामुळे २०१५ मध्ये चुरशीने चौरंगी लढत झाली होती. यावेळी मात्र काही गटांनी बदललेल्या परिस्थितीनुसार एकमेकांसोबत हातमिळवणी केली आहे. परिणामी संत गोरोबाकाका परिवर्तन पॅनेल विरुद्ध जय हनुमान युवा आघाडी विरुद्ध वाठार विकास आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे.
प्रभाग क्रमांक एकमध्ये तीन जागांसाठी संत गोरोबाकाका पॅनेल विरुद्ध जय हनुमान आघाडी अशी थेट लढत आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये या प्रमुख पॅनेलसोबत शिंदे गटाच्या तीन अपक्ष उमेदवारांमुळे लढतीची रंगत वाढली आहे. हे अपक्ष किती आणि कोणाची मते खाणार यावर येथील निकाल अवलंबून आहे. प्रभाग क्रमांक तीन व चारमध्ये पारंपरिक काटाजोड लढती होत आहेत. या प्रभागावर गावाचे लक्ष आहे. या जागांंवर युवा नेते महेश जगताप, मोहन पाटील, परशुराम पाटील, वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, इक्बाल शेख, बाबासो पटाईत यांनी विशेष ताकद लावली आहे. प्रभाग क्रमांक पाच हा आरक्षित असून येथे सर्वांत जास्त उमेदवार उभे आहेत. तसेच येथे पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये थेट अटीतटीची लढत होत आहे. सरपंचपदाचे संभावित आरक्षण अनुसूचित जाती पुरुष होण्याची शक्यता असल्यामुळे येथील लढतीकडे सगळ्याचे लक्ष आहे. संत गोरोबाकाका परिवर्तन पॅनेलचे नेतृत्व प्रा. नानासो मस्के, सूर्यकांत शिर्के, महेश जगताप, आदी करीत आहेत. तर जय हनुमान युवाशक्तीचे नेतृत्व महेंद्र शिंदे, इक्बाल शेख, वसंत माळी यांच्याकडे आहे. वाठार विकास आघाडीचे नेतृत्व पी. डी. पाटील, संतोष वाठारकर, आदींकडे आहे.
चौकट पतिपत्नी एकाच वॉर्डमध्ये
यंदा सरपंचपदाची लॉटरी अनुसूचित जातीच्या उमेदवारास लागू शकते असा अंदाज असल्यामुळे येथे तगडी लढत होत आहे. माजी उपसरपंच तेजस्विनी वाठारकर या व त्यांचे पती संतोष वाठारकर हे दोघे या प्रभागातून नशीब अजमावत आहेत. वाठारकर या पाच वर्षे उपसरपंच होत्या. पतिपत्नी एकाच वॉर्डात उभे असल्यामुळे गावात हा चर्चेचा विषय बनला आहे.