पुणे पदवीधरचे रणांगण : अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे स्पर्धेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:18 AM2020-11-03T11:18:05+5:302020-11-03T11:22:02+5:30
pune padwidhar, ellecation, ncp, bjp, pune, kolhapurnews, politics पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कुणाच्या गळ्यात पडणार, यावरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र अवलंबून आहे. सध्या या पक्षाकडून अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे, अजिंक्यराणा पाटील हे स्पर्धेत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार कुणाला पसंती देतील त्यालाच ही संधी मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात कोण पुढे राहू शकेल त्यालाच पसंती मिळण्याची शक्यता आहे. महाआघाडी विरुद्ध भाजप अशी ही लढत होणार आहे.
कोल्हापूर : पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कुणाच्या गळ्यात पडणार, यावरच या मतदारसंघातील लढतीचे चित्र अवलंबून आहे. सध्या या पक्षाकडून अरुण लाड, उमेश पाटील, श्रीमंत कोकाटे, अजिंक्यराणा पाटील हे स्पर्धेत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार कुणाला पसंती देतील त्यालाच ही संधी मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात कोण पुढे राहू शकेल त्यालाच पसंती मिळण्याची शक्यता आहे. महाआघाडी विरुद्ध भाजप अशी ही लढत होणार आहे.
या मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम अचानक सोमवारी जाहीर झाल्यावर इच्छुकांसह राजकीय पक्षांचीही तारांबळ उडाली. कारण ही निवडणूक मार्चमध्ये होईल, असा सर्वांचाच होरा होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे या मतदारसंघांचे मावळते प्रतिनिधित्व करतात. विधानसभेला कोथरूड मतदारसंघातून ते निवडून आल्यावर ही जागा रिक्त आहे. पाचपैकी चारवेळा या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे.
एकदा प्रा. शरद पाटील विजयी झाले. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी झाली नसती तर चंद्रकांत पाटील हे आमदार झाले नसते. त्यामुळे यावेळेला बंडखोरी टाळून व ताकद एकवटून ही जागा भाजपकडून काढून घेण्याच्या तयारीनेच राष्ट्रवादीने मोर्चेबांधणी केली आहे.
पुण्यासह, सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांचा हा मतदारसंघ आहे. पदवीधर मतदार असल्याने उमेदवाराची प्रतिमा, मतदार नोंदणीसाठी घेतलेले कष्ट आणि वय हादेखील महत्त्वाचा मुद्दा उमेदवारीसाठी महत्त्वाचा ठरतो. राष्ट्रवादीकडील स्पर्धेतील पहिल्या चारपैकी तिघे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. श्रीमंत कोकाटे यांची सामाजिक प्रतिमा चांगली असून त्यांचे पवार यांच्याशी फार वर्षांपासूनचे चांगले संबंध आहेत.
अरुण लाड यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे प्रयत्नशील आहेत. अजिंक्यराणा पाटील हा पवार यांचे एकनिष्ठ माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा आहे. उमेश पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. कागलमधून भैय्या माने यांनाही संधी मिळावी यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रयत्नशील आहेत.