वस्त्रनगरी शेतकरी संघटनांची संघर्षभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:48 PM2017-09-12T23:48:32+5:302017-09-12T23:48:32+5:30
राजाराम पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : महाराष्टÑातील भाजपप्रणीत महायुतीचा एल्गार इचलकरंजीतील थोरात चौकातून झाला होता. त्याला साडेतीन वर्षे उलटली. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर खोत हे नवीन शेतकरी संघटनेची घोषणा दसºया दिवशी इचलकरंजीतच पहिला राज्यव्यापी मेळाव्यात करणार आहेत. त्यामुळे वस्त्रोद्योगात अग्रेसर असलेले हे शहरच संघर्षभूमी ठरणार, असाच राजकीय व्होरा आहे. म्हणूनच या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी बहुतांशी वेळा राजकीय क्षेत्रात नव्याने होणाºया आघाडी किंवा युतीचा प्रारंभ करवीरनगरीतून होत असे. मात्र, त्याला ३१ जानेवारी २०१४ ही तारीख अपवाद ठरली. त्यावेळी भाजप-शिवसेना-स्वाभिमानी शेतकरी-राष्टÑीय समाज पक्ष-रिपब्लिकन पार्टी-आठवले गट अशी युतीची पहिली महासभा इचलकरंजीतील थोरात चौकात झाली. त्या सभेची धुरा खासदार शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांच्या खांद्यावर होती. तेव्हा सभेत गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, रामदास आठवले, खासदार शेट्टी, महादेव जानकर, आमदार हाळवणकर अशा नेत्यांनी पहिलेच मैदान गाजविले.
अशी पार्श्वभूमी असलेल्या इचलकरंजीतच दुसरी शेतकरी संघटना घोषित करणाºया राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा दसरा मेळावा शनिवारी (दि. ३० सप्टेंबर) होत असल्याने त्याला महत्त्व आहे. खासदार शेट्टी यांची शिरोळ तालुक्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजकीय कारकीर्द चालू झाली. त्यानंतर संघटनेचे लोण पश्चिम महाराष्टÑ व त्या पाठोपाठ राज्यात फोफावले. तेव्हा सत्तारूढ असलेल्या कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारच्या विरोधात ‘स्वाभिमानी’ ने संघर्ष केला.
सन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीमध्ये राजकीय घडामोडी वेगाने घडल्या आणि आघाडीच्या विरोधात महायुती जन्माला आली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावेळी ‘स्वाभिमानी’ चे म्हणून सदाभाऊ खोत कृषी-पणन व फलोत्पादन राज्यमंत्री झाले. केंद्रात व राज्यात भाजपप्रणीत सत्ता आल्यानंतर आघाडी सरकारप्रमाणेच शेतकºयांच्या प्रश्नाकडे महायुती दुर्लक्ष करीत असल्याचे खासदार शेट्टी यांच्या लक्षात आले आणि कृषी कर्जमाफीच्या वेळी तर सरकार व ‘स्वाभिमानी’तील संघर्षाने टोक गाठले. ‘स्वाभिमानी’ने सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली असताना राज्यमंत्री खोत मात्र सरकारच्याच बाजूला राहिले. अखेर ‘स्वाभिमानी’ने खोत यांना संघटनेतून बाजूला केले. त्याचाच परिपाक म्हणजे नवीन शेतकरी संघटनेचा उदय मानला जात आहे. त्याची वाटचाल मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादावर असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
नवीन संघटना भाजपप्रणित ?
इचलकरंजीत शनिवारी ( दि. ९ सप्टेंबर) झालेल्या एका कार्यक्रमात राज्यमंत्री खोत यांनी सध्याच्या सरकारचे गोडवे गायले होते. ते म्हणाले, पूर्वीच्या आघाडी सरकारने उसासाठी किमान किफायतशीर दर जाहीर करावा, यासाठी आम्हाला रक्त सांडावे लागले. मात्र, सध्याच्या युती सरकारने उसासाठी साखर उताºयावर आधारित किमान दर जाहीर केला आहे. तो ९ टक्के उताºयासाठी २५५० रुपये प्रतिटन ते १२ टक्के उताºयासाठी ३२२० रुपये प्रतिटन इतका आहे. त्यामुळे शेतकºयांच्या उसाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत चांगला दर मिळणार आहे. जलयुक्त शिवार, प्रधानमंत्री निधीतून शेती सिंचन, अशा अनेक योजनांचाही उल्लेख केला. त्यामुळे खोत यांची नवी शेतकरी संघटना ही भाजपप्रणीत संघटना असणार का, याचीच उत्सुकता आहे.
‘स्वाभिमानी’ वर घाव
घालण्यासाठी इचलकरंजीच बरी
शिरोळ हा ‘स्वाभिमानी’चा बालेकिल्ला असून, लगतच्या हातकणंगले तालुक्यात ‘स्वाभिमानी’चा कमालीचा प्रभाव आहे. ‘स्वाभिमानी’वर आघात करायचा असेल, तर शिरोळ आणि हातकणंगले या दोन्ही तालुक्यांतील ग्रामीण भागात दुसºया शेतकरी संघटनेला मेळावा घेता येणार नाही. त्यातल्या त्यात सदाभाऊ खोत यांच्या संघटनेला तीव्रपणे विरोध होणार; पण शिरोळपासून जवळच असलेले इचलकरंजी हे औद्योगिक शहर असल्यामुळे येथे ‘स्वाभिमानी’ काही प्रमाणात ‘वीक’ आहे. म्हणून सुरक्षितता आणि शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत मर्मावर घाव घालणारा मेळावा म्हणून इचलकरंजीची निवड केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.