कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट उत्खनन पुन्हा सुरू होणार, शासनाच्या हालचाली 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 01:54 PM2023-01-03T13:54:21+5:302023-01-03T13:55:15+5:30

पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही?

Bauxite mining to resume in Kolhapur district | कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट उत्खनन पुन्हा सुरू होणार, शासनाच्या हालचाली 

कोल्हापूर जिल्ह्यात बॉक्साईट उत्खनन पुन्हा सुरू होणार, शासनाच्या हालचाली 

googlenewsNext

कोल्हापूर : केंद्राच्या अधिसूचनेप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील १८४ गावांचा संवेदनशील क्षेत्रात समावेश आहे. यातील ३१ गावे वगळावीत, अशी राज्य शासनाची मागणी आहे. यापैकी १७ गावांत बॉक्साईटचे उत्खनन सुरू करण्यासाठी, एका गावात औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) निर्माण करण्यासाठी आणि उर्वरित १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याने ती सर्व गावे वगळण्याची मागणी राज्य शासनाने केंद्राकडे केली आहे. ती जर वगळली, तर कोल्हापूर जिल्हा पुन्हा बॉक्साईट उत्खननाच्या विळख्यात अडकेल, अशी भीती ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सोमवारी व्यक्त केली. 

तज्ज्ञांनी, अभ्यासकानी, पर्यावरणप्रेमींनी संवेदनशील क्षेत्रातील कोणतीही गावे वगळू नयेत, अशी मागणी करणारी पत्रे, ई-मेल केंद्र व राज्य शासनाला पाठवावीत, असे आवाहन डॉ. बाचूळकर यांनी केले आहे.

डॉ. के. कस्तुरीरंगन समितीच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, पश्चिम घाटातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांची व यामध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांची यादी केंद्र शासनाने २०१३ मध्ये जाहीर केली. यामध्ये सहा राज्यांतील ५९९९४० चौ. किलोमीटर क्षेत्र पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केले. पण या निर्णयास सर्व सहा राज्यांनी विरोध सुरू केला. आता महाराष्ट्रानेही राज्यासाठी जाहीर केलेल्या १७३४० चौ. किलोमीटर संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट २१३३ गावांपैकी ३८८ गावे वगळण्याची मागणी केंद्राकडे केली आहे.

आजरा तालुक्यातील हाजगोळी खुर्द व केराकबोळ, भुदरगड तालुक्यातील बिद्री, हणबरवाडी, मुरुकाटे, फणसवाडी, राधानगरी तालुक्यातील करंजफेण, सावर्डे, शाहूवाडी तालुक्यातील ऐनवाडी, म्हाळसवडे, पणुंद्रे, शिराळे तर्फे मलकापूर, सोनुर्ले ही १३ गावे संवेदनशील क्षेत्राबाहेर असल्याचा राज्य शासनाचा दावा आहे. चंदगड तालुक्यातील ओगोली, धामापूर, कानूर खुर्द, पिलानी, पुंद्रा, शाहूवाडी तालुक्यातील बुरंबाळ, धनगरवाडी, गिरगाव, मानोली, निवळे, शिराळे तर्फे वारूण, उदगिरी, येळवण जुगाई, राधानगरी तालुक्यातील पडसाळी, पाटपन्हाळा व रामनवाडी आणि भुदरगड तालुक्यातील वासणोली अशा एकूण १७ गावांत उत्खनन सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 

भुदरगडमधील देवकेवाडी येथे औद्योगिक वसाहत निर्मितीचा विचार आहे, यासाठी ही १८ गावे वगळावीत, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड या पश्चिम घाटात वसलेल्या तालुक्यात गेली अनेक वर्षे मायनिंग प्रकल्प सुरू आहेत. मग आजअखेर या तालुक्यात विकास का झाला नाही? असा प्रश्न डॉ. बाचूळकर यांनी विचारला आहे.

Web Title: Bauxite mining to resume in Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.