बॉक्साईटने बुजविले खड्डे
By admin | Published: July 25, 2014 11:50 PM2014-07-25T23:50:21+5:302014-07-26T00:35:04+5:30
वारूळनजीकची घटना : आंदोलनाचा इशारा; ‘मानवाधिकार’ची कारवाईची मागणी
मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील करंजोशी ते वारूळ (ता. शाहूवाडी) रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी बेकायदेशीरपणे गौण खनिज, बॉक्साईटचा वापर केला आहे. तरी गौण खनिजांचा दुरुपयोग करणाऱ्या ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने, खनिकर्म अधिकारी भोगे यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष प्रकाश गोसावी यांनी दिले आहे. कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर खड्डे पडले आहेत. कायद्यानुसार बॉक्साईट गौण खनिज म्हणून राष्ट्रीय संपत्ती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२०) गौण खनिजांची
ट्रॅक्टरने वाहतूक केली. बॉक्साईटचे रस्त्यावर ढीग मारून खड्डे भरले
आहेत. खड्डे भरण्यासाठी मुरुमाचा वापर केला जातो; मात्र गौण
खनिज वापरून राष्ट्रीय संपत्तीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई
झाली पाहिजे, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही गोसावी यांनी दिला
आहे. (प्रतिनिधी)