बावड्याला तिन्ही बाजूने पुराच्या पाण्याचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:16 AM2021-07-24T04:16:58+5:302021-07-24T04:16:58+5:30
दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कसबा बावड्याच्या तिन्ही बाजूला पुराच्या पाण्याने मोठा वेढा दिला आहे. बावडा- शिये रोडवर ...
दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने कसबा बावड्याच्या तिन्ही बाजूला पुराच्या पाण्याने मोठा वेढा दिला आहे. बावडा- शिये रोडवर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. रेणुका मंदिर येथेही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने बावडा - कोल्हापूर हा मार्ग बंद झाला आहे . बावडा स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरल्याने येथील अंत्यसंस्कार बंद करण्यात आले आहेत. मळ्यात राहणाऱ्या लोकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपली जनावरे बावडा भाजीमंडईत आणून बांधली आहेत. शाहू जन्मस्थळ परिसरातही पुराचे पाणी शिरले आहे.
बावडा- शिये रोडवर पाणी आले आहे. येथे ९ ते १० फुटाहून अधिक उंची पाण्याने गाठली आहे. शाहूपुरी पोलिसांनी बॅरिकेट लावून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. कसबा बावडा स्मशानभूमीत नॉन कोविड मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येत होते; परंतु स्मशानभूमीच्या गेट जवळ पाच फुटाहून अधिक पाणी आल्याने स्मशानभूमीत जाता येत नसल्याने येथील अंत्यसंस्कार बंद करण्याची वेळ आली.
बावड्यातील रेणुका मंदिर पिछाडीस असणारी अपार्टमेंट तसेच वाडकर मळा, ठोंबरे मळा, खामकर मळा, बडबडे मळा, पाटील मळा, उलपे मळा, वाडकर मळा, माळी मळा आदी ठिकाणच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. स्थलांतर करताना मळ्यातील लोकांनी सोबत आपली जनावरे घेऊनही स्थलांतर करत आहेत. जनावरे बांधण्यासाठी कुठेच जागा नसल्याने भाजी मंडईत जनावरे बांधण्याची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील वेळेस म्हणजेच २०१९ साली जेव्हा मोठा पूर आला होता तेव्हा शाळा, विविध संस्थांचे हॉल, कार्यालय येथे स्थलांतरीत लोकांची सोय करण्यात आली होती; परंतु सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असल्याने अनेक शाळा, संस्था, पॅव्हिलियन येथे कोरोना सेंटर सुरू असल्याने स्थलांतरित लोकांची एकत्रित सोय करता येत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे पुरामुळे स्थलांतरित लोकांनी आपल्या पै पाहुण्यांकडेच जावे, अशा सूचना केल्या आहेत.
दरम्यान, पावसाचा प्रचंड वेग पाहून तसेच पूर परिस्थितीचा संभाव्य धोका ओळखून पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील पूरग्रस्त ठिकाणी भेटी देऊन मदत करत आहेत. बावडा रेस्क्यू फोर्स आणि राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्तेही लोकांना मदतीसाठी पाण्यात उतरले आहेत.
फोटो: २३ बावडा महापूर
१) कसबा बावडा रोडवरील रेणुका मंदिर येथे पाणी आल्याने बावडा- कोल्हापूर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
२३ बावडा महापूर १ २) बावडा- शिये रोडवर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
२३ बावडा महापूर २ ३) बावडा स्मशानभूमीत पुराचे पाणी शिरल्याने येथील अंत्यसंस्कार बंद करण्यात आले आहेत.
२३ बावडा महापूर ३ ४) जनावरे बांधण्यास कोठेही जागा उपलब्ध न झाल्याने भाजी मंडई येथे जनावरे बांधण्याची सोय करण्यात आली आहे.