बावड्याचे नेतृत्व रणरागिणींकडे
By admin | Published: October 3, 2016 01:07 AM2016-10-03T01:07:16+5:302016-10-03T01:07:16+5:30
सतेज पाटील : बैठकीला दहा हजार मराठा बांधव उपस्थित, शाळा-कॉलेज बंद ठेवून मोर्चात सहभागी होणार
कोल्हापूर/कसबा बावडा : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कोल्हापुरात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी कसबा बावडा, लाईन बाजार येथील मराठा बांधव दहा रणरागिणींच्या नेतृत्वाखाली ‘भगवा चौक’ येथून निघतील. या दिवशी बावड्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवून सर्व घटकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे केले.
कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदान येथे मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी सकल मराठा बांधवांची व्यापक बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस तब्बल दहा हजार मराठी बांधवांनी उपस्थिती दर्शविली. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. पावसाच्या वातावरणात जराही विचलित न होता, मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवीत मराठा बांधवांनी आपली वज्रमूठ दाखविली.
यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी, कसबा बावड्याच्या मुख्य रस्त्यावरून मोटारसायकल रॅली काढून वातावरणनिर्मिती करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चास प्रेरणादायी चित्रफीतही दाखविण्यात आली. मोहन सालपे यांनी मोर्चाची आचारसंहिता वाचून दाखविली.
आमदार पाटील म्हणाले, मोर्चादिवशी सकाळी बावड्यातील दहा रणरागिणी लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहू जन्मस्थळाचे दर्शन घेतील. त्यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९ वाजता भगवा चौक येथून कसबा बावडा, लाईन बाजार येथील मराठा बांधव मोर्चासाठी बाहेर पडतील. या दिवशी बावड्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवून सर्वांनी आपल्या घरांना कुलूप लावून मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊया, असे आवाहनही त्यांनी केले. समाजहिताचा संदेश कसबा बावड्याने नेहमीच दिला आहे, असे ते म्हणाले. वसंत मुळीक म्हणाले, कसबा बावड्याने मनात आणल्यास १५ लाखांचा हा मोर्चा २५ लाखांचा होईल. आमचा लढा कुठल्या जातीविरोधात नाही, तर अॅट्रॉसिटीच्या गैरवापराविरोधात आहे. यावेळी शिवानी पाटील यांनी, कोपर्डी घटनेचा निषेध करत मराठा रणरागिणी यापुढे गप्प बसणार नाहीत, तर लढणार आहेत. स्नेहल दुर्गुळे म्हणाल्या, आरक्षण नसल्याने मराठा समाजाची शिक्षणाची दारे बंद झाली आहेत. प्रणाली पार्टे म्हणाल्या, सध्या मुलगी गल्ली व घरातही सुरक्षित नाही. त्यांना लहानपणापासूनच स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. अॅड. राजनंदिनी जाधव म्हणाल्या, मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
स्वागत किशोर पाटील यांनी केले. मानसिंग जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
आमदार समर्थकांच्या भूमिकेत
या बैठकीचे नियोजन कसबा बावडा मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केले होते. यावेळी आमदार सतेज पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांत समर्थकांच्या भूमिकेत बसून आपला पाठिंबा व्यक्त केला.