स्वातंत्र्यलढ्याचा मूकनायक ‘बावडेकर आखाडा’ - 100 नंबरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:36 AM2019-02-18T00:36:05+5:302019-02-18T00:37:19+5:30
शहरातील प्रत्येक तालीम मंडळांना स्वत:चा इतिहास आणि त्याचा प्रदीर्घ वारसा लाभलेला आहे. प्रत्येक तालमीचा इतिहास महत्त्वपूर्णदेखील आहे. या तालमींनी समाजजीवनात एक महत्त्वाचे योगदान दिले आहे. समाजाची जडणघडण, आदरयुक्त दबदबा, तसेच सामाजिक सलोखा याबाबतीत अत्यंत प्रभावी भूमिका बजावली
भारत चव्हाण ।
कोल्हापूर : शहरातील प्रत्येक तालीम मंडळांना स्वत:चा इतिहास आणि त्याचा प्रदीर्घ वारसा लाभलेला आहे. प्रत्येक तालमीचा इतिहास महत्त्वपूर्णदेखील आहे. या तालमींनी समाजजीवनात एक महत्त्वाचे योगदान दिले आहे. समाजाची जडणघडण, आदरयुक्त दबदबा, तसेच सामाजिक सलोखा याबाबतीत अत्यंत प्रभावी भूमिका बजावली आहे. म्हणून या तालमी म्हणजे कोल्हापूरची वेगळी संस्कृती आहे. परिसरातील समाज या तालमींशी एकरूप झालेला पाहायला मिळतो. शिवाजी पेठेतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक तसेच स्वातंत्र्याच्या लढ्याचा मूकनायक अर्थात पंत अमात्य बावडेकर आखाड्याचाही एक वेगळा इतिहास आहे. हा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा, अन्यायाविरूद्ध पेटून उठण्याची उर्मी देणारा आहे.
शिवाजी पेठ म्हणजे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, चळवळीतील एक प्रमुख केंद्र आहे. हा वारसा १६२ वर्षांचा आहे. या पेठेने हाक दिली, की त्याचे पडसाद राज्याच्या राजधानीपर्यंत उमटायचे. तत्कालीन राज्यकर्ते हादरायचे. स्वातंत्र्याच्या चळवळीत शिवाजी पेठेने मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्याचा लढा असो, की संयुक्त महाराष्टÑाची चळवळ असो. सामाजिक लढा असो, की प्रबोधनाचा लढा असो. सर्वसामान्यांच्या हक्काचा लढा असो, की महागाईविरूद्धचा लढा असो. शिवाजी पेठ सातत्याने आघाडीवर राहिली आहे. पेठेने सातत्याने वैचारिक लढे लढले, तसे रस्त्यावरील लढेही लढले. त्यातून इतिहास रचला गेला, तो तालमींना केंद्रबिंदू मानून!
पेठेत पहिली तालीम स्थापन झाली, ती पंत अमात्य बावडेकर आखाडा! १८५७ चा काळ म्हणजे क्रांतीचा आणि क्रांतिकारकांचा होता. ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करण्याचा होता.
देशाला स्वातंत्र मिळवून देण्याच्या हेतूने देशभर ब्रिटिशांविरूद्ध क्रांती लढ्याची ज्योत भडकली होती. त्यावेळी क्रांतिवीर छत्रपती चिमासाहेब महाराज यांनी कोल्हापूर संस्थान आणि परिसरात प्रस्थापित राजवटीच्या विरोधात बंड करून व्यापक चळवळ उभी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार या आखाड्याची स्थापना पंत अमात्य बावडेकर सरकार यांनी केली. तो काळ १८५७ चा होता. त्यावेळी बावडेकर सरकार सध्याच्या तालमीच्या परिसरात राहत असत. छत्रपती घराण्याशी बावडेकर यांचे संबंध चांगले असल्यामुळे आखाडा स्थापन करण्याच्या सूचनेचा तत्काळ अंमल झाला. त्याच दरम्यान सरदार तालमीचीसुद्धा स्थापना झाली.
बलदंड शरीरयष्टीचे क्रांतिकारक निर्माण करणे आणि त्यांना स्वातंत्र्याच्या लढाईत सामील करणे, या हेतूने या दोन तालमींची स्थापना केली होती. पेठेतील शेकडो तरुण या तालमीत जाऊन व्यायाम करूलागले. बलदंड शरीर कमावण्यासाठी सकाळ-संध्याकाळ तालमीत शड्डू घुमायला लागले. ज्या हेतूने आखाडा स्थापन केला. तो हेतू साध्य झाला. बावडेकर आखाड्याने अनेक तगडे पैलवान दिले; त्यामुळे पुढे हाच आखाडा स्वातंत्र्यलढ्याचे, तसेच अनेक सामाजिक चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील अनेक भूमिगत कार्यकर्ते या आखाड्यात आश्रयाला येत असत. ब्रिटिशांविरुद्ध अनेक बैठका येथे झाल्या. ब्रिटिशांविरुद्ध कट शिजले.
बावडेकर आखाडा तालमीला पुढे दिनकर रामजी शिंदे यांच्यासारखा ताकदीचा पैलवान लाभला. अत्यंत प्रामाणिक आणि वजनदार पैलवान म्हणून शिंदे यांचा शिवाजी पेठेत नावलौकिक होता. दिनकरराव शिंदे स्वत:च्या कर्तृत्वावर १९२० साली अॅटवर्क येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्र्धेत खेळले. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी आॅलिम्पिकमध्ये भाग घेतला खरा, पण त्यांना त्यात यश मिळाले नाही. महाराजांनी मात्र स्पर्धेहून परत आल्यावर त्यांचे कौतुक केले. पुढे शिंदे यांनी आॅल इंडिया रेसलिंग चॅम्पियनचा किताब मिळविला.
पुढच्या काळात दिनकरराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बावडेकर आखाड्याचे कामकाज सुरूराहिले. मराठी चित्रपटातील अनेक कलावंत आखाड्यात शरीरसंपदा कमावण्याकरिता येत असत. बाबूराव पेंढारकर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, बाबूराव पेंटर, सूर्यकांत, चंद्रकांत यांसारख्या दिग्गज कलाकारांचा त्यामध्ये समावेश होता; त्यामुळे त्याकाळात आखाड्यात सराव करणाऱ्या महादेव साळोखे, गोविंद साळोखे, बाबूराव साळोखे, वस्ताद नारायण यादव, शाहीर तिलक पिराजीराव सरनाईक यांसारख्या उमद्या, तगड्या तरुणांना ऐतिहासिक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.
पुढे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संयुक्तमहाराष्टÑाची चळवळ असो, की नागरिकांच्या हक्काच्या मागण्या असोत, या आखाड्याने कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन व ताकद देण्याचे काम केले; त्यामुळेच हा आखाडा म्हणजे स्वातंत्र्य तसेच सामाजिक लढ्याचा मूकनायक बनला आहे.
आखाड्याचा ऐतिहासिक बाज
कौलारूदगडी इमारतीत छोटेखानी लाल मातीचा आखाडा.
आखाड्याच्या समोरच एक स्वतंत्र कौलारूइमारत.
या इमारतीत ३ जून १८७५ साली राधा-कृष्णाचे ऐतिहासिक मंदिर.
आखाड्याला लागूनच मोठी विहीर व पाण्याचा हौद.
आखाड्यात राबविले जाणारे उपक्रम
शंभर वर्षांहून अधिककाळ श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा
जन्माष्टमीच्या दुसºया दिवशी दहीहंडीचे आयोजन.
गाण्यांचे कार्यक्रम, भजनांचे कार्यक्रम.
प्रत्येकवर्षी शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन.
आखाड्याची स्थिती
आखाड्याची मूळ इमारत व लाल मातीचा आखाडा पूर्वीसारखाच आहे.
आखाड्यात बाहेरगावचे
२५ हून अधिक पैलवान कुस्तीचे धडे घेत आहेत.
आखाड्याला लागूनच माजी आमदार सुरेश साळोखे यांच्या प्रयत्नातून अद्ययावत व्यायामशाळा सुरू आहे.
व्यायामशाळेत पुरेसे व्यायाम साहित्य असून, २५०हून अधिक तरुण शरीर कमावत आहेत.
162
वर्षांचा वारसा शिवाजी पेठेला लाभला आहे तो म्हणजे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा चळवळीमुळे शिवाजी पेठ हे एक प्रमुख केंद्र बनले आहे.
1857
साली शिवाजी पेठेत पहिली तालीम स्थापन झाली, ती म्हणजे पंत अमात्य बावडेकर आखाडा
1920
साली अॅटवर्क येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्र्धेत दिनकररावशिंदे स्वत:च्या
कर्तृत्वावर खेळले
कार्यकारी मंडळ
अध्यक्ष - अशोक साळोखे
उपाध्यक्ष - विजय मोरे
व्यवस्थापक - सतीश शिंदे
सदस्य - विजय लाड, सुरेश साळोखे, अमर साळोखे, जितेंद्र भोसले, संग्राम गायकवाड, सुहास सासने.