Kolhapur Crime: दीड वर्षांपूर्वी शिकार, बिबट्यावर गोळी झाडणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 16:17 IST2025-03-17T16:16:32+5:302025-03-17T16:17:41+5:30
पोलिस कोठडीत रवानगी, बंदुकीचा शोध सुरू

Kolhapur Crime: दीड वर्षांपूर्वी शिकार, बिबट्यावर गोळी झाडणारा अटकेत
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील बुझवडे येथे बिबट्याची शिकार करणारा बयाजी रामू वरक (वय ४५, रा. बुजवडे) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्याने दीड वर्षांपूर्वी ठासणीच्या बंदुकीने बिबट्याला गोळी घातल्याची माहिती चौकशीतून समोर आली. त्याच्याकडील बंदूक अद्याप पोलिसांना सापडलेली नाही. अटकेतील दोघांकडून बिबट्याच्या नख्या विकत घेतलेल्या व्यक्तींचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिबट्याचे कातडे विकण्यासाठी आलेले धाकलू बाळू शिंदे (६५, रा. हेरे, ता. चंदगड) आणि बाबू सखाराम डोईफोडे (५७, रा. बांदराई धनगरवाडा, तिलारीनगर, ता. चंदगड) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपोवन मैदानात सापळा लावून पकडले होते. त्यांच्या चौकशीतून बिबट्याची शिकार करणारा बयाजी वरक याचे नाव समोर आले. त्याला पोलिसांनी अटक केली.
दीड वर्षांपूर्वी बुझवडे येथे शेतात ठासणीच्या बंदुकीने बिबट्याची शिकार केल्याची कबुली त्याने दिली. बंदुकीची माहिती देण्यास तो टाळाटाळ करीत आहे. रविवारी त्याला सोबत घेऊन पोलिसांनी बुझवडे परिसरात बंदुकीचा शोध घेतला. मात्र, प्रत्येकवेळी तो नवीन ठिकाण दाखवत असल्याने अद्याप बंदुकीचा शोध लागलेला नाही.
शेळ्या खाल्ल्याने बिबट्याची शिकार?
बयाजी वरक याचा शेतात जनावरांचा गोठा आहे. दीड वर्षांपूर्वी बिबट्याने त्याच्या चार शेळ्या फस्त केल्या होत्या. नुकसान झाल्याने त्याने बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचा विचार केला. त्यानंतर एक दिवस शेळीच्या शिकारीसाठी आलेल्या बिबट्यावर त्याने गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर बिबट्या एक ते दीड किलोमीटर दूर गेला होता. पाठलाग करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याचे कातडे काढून लपवून ठेवल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
नखे घेणारे कोण?
वन्य प्राण्यांचे अवयव खरेदी करणे कायद्याने गुन्हा आहे. अटकेतील संशयितांनी १५ हजारांत बिबट्याच्या नखांची विक्री केली आहे. नखे कोणी घेतल्या याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात त्यांनाही आरोपी केले जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.