बीबीए, बीसीएही आता मुलींसाठी विनाशुल्क, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

By पोपट केशव पवार | Published: August 24, 2024 04:32 PM2024-08-24T16:32:48+5:302024-08-24T16:33:43+5:30

दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार

BBA, BCA now free for girls, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil informed | बीबीए, बीसीएही आता मुलींसाठी विनाशुल्क, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

बीबीए, बीसीएही आता मुलींसाठी विनाशुल्क, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

पोपट पवार

कोल्हापूर : बारावीनंतर उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींना ६४२ व्यावसायिक अभ्यासक्रमांत मोफत उच्चशिक्षण देण्यात येत असून, आता या योजनेत आणखी २०० व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी 'लोकमत'शी बोलताना दिली. या नव्या समाविष्ट करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमात बीबीए, बीसीए, बीसीएस यांचाही समावेश असून, हा निर्णय येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले. या निर्णयामुळे जास्तीत जास्त मुलींना मोफत उच्चशिक्षण घेता येणार आहे.

राज्य सरकारने विविध ६४२ व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, इतर मागास प्रवर्ग व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींची शंभर टक्के शुल्कमाफी करण्याचा निर्णय नुकताच घेतला. याची अंमलबजावणी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली आहे. हे शुल्क शासकीय महाविद्यालये, निमशासकीय महाविद्यालय, शासन अनुदानित अशासकीय, अंशतः अनुदानित, कायम विनाअनुदानित, तंत्रनिकेतन, सार्वजनिक विद्यापीठे, शासकीय अभिमत/ स्वायत्त विद्यापीठांमध्ये पूर्णपणे माफ आहे.

मात्र, सरकारने शुल्कमाफीसाठी जे ६४२ व्यावसायिक अभ्यासक्रम निवडले आहेत. त्यात बीबीए, बीसीए, बीसीएस हे विद्यार्थ्यांची प्रचंड मागणी असणारे अभ्यासक्रम नाहीत. अनेक कॉलेजमध्ये याच अभ्यासक्रमांना सर्वाधिक मागणी असल्याचे लक्षात आल्याने मुलींच्या मोफत शिक्षण योजनेत विद्यार्थिनींची मागणी असणारे आणखी २०० अभ्यासक्रम समाविष्ट करण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे.

दृष्टिक्षेपात अभ्यासक्रम

मोफत शिक्षण योजनेत सध्या असलेले व्यावसायिक अभ्यासक्रम : ६४२
नव्याने समाविष्ट करण्यात येणारे अभ्यासक्रम : २००

मुलींना उच्चशिक्षण मोफत करण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. या मोफत शिक्षणात ६४२ अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. मात्र, असे अनेक अभ्यासक्रम आहेत त्याकडे विद्यार्थ्यांचा जास्त ओढा आहे; पण त्या अभ्यासक्रमांचा या मोफत शिक्षण योजनेत समावेश नव्हता. आमच्या हे लक्षात आल्यानंतर विद्यार्थिनींचा जास्त मागणी असणाऱ्या नव्या २०० अभ्यासक्रमांचा समावेश मोफत शिक्षण योजनेत करणार आहे. दोन दिवसांत याचा निर्णय जाहीर करू. -चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

Web Title: BBA, BCA now free for girls, Higher and Technical Education Minister Chandrakant Patil informed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.