वर्दीचे आकर्षण अन् बेरोजगारी; कोल्हापुरात पोलिस भरतीच्या रांगेत बीई, बीटेक, बीएड, कायद्याचेही पदवीधारक
By उद्धव गोडसे | Updated: June 20, 2024 15:42 IST2024-06-20T15:42:01+5:302024-06-20T15:42:26+5:30
कोल्हापुरात २१३ जागांसाठी ११ हजार ४४५ अर्ज

वर्दीचे आकर्षण अन् बेरोजगारी; कोल्हापुरात पोलिस भरतीच्या रांगेत बीई, बीटेक, बीएड, कायद्याचेही पदवीधारक
उद्धव गोडसे
कोल्हापूर : वाढती बेरोजगारी, खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांची अशाश्वती आणि सरकारी नोकरीची ओढ यामुळे उच्च शिक्षण घेतलेलेही अनेक विद्यार्थी पोलिस भरतीत नशीब आजमावत आहेत. कोल्हापूरपोलिस दलाकडील रिक्त २१३ जागांसाठी आलेल्या ११ हजार ४४५ अर्जांमध्ये अनेक इंजिनिअरसह बीटेक, बीबीए, बीसीए, बीएड, बीपीएड आणि विधी पदवीधारक उमेदवारांचाही समावेश आहे. यामुळे पोलिस दलात उच्चशिक्षितांचा टक्का वाढणार आहे.
पोलिस भरतीसाठी १२ वी पास एवढीच शैक्षणिक पात्रता आहे. मात्र, सरकारी नोकरीसह खाकी वर्दीचा रुबाब मिरवण्याची संधी मिळत असल्याने उच्चशिक्षित तरुणही पोलिस दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करतात. कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाकडे रिक्त असलेल्या २१३ जागांसाठी तब्बल ११ हजार ४४५ अर्ज आले आहेत. अर्जांची संख्या वाढल्यामुळे एका जागेसाठी सुमारे ५४ उमेदवारांना संघर्ष करावा लागत आहे. मैदानी चाचणीत उमेदवारांचा कस लागणारच आहे. तसेच लेखी परीक्षेतही उमेदवारांचे बौद्धिक कौशल्य पणाला लागणार आहे. यात उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे ही स्पर्धा आणखी कठीण बनत आहे.
वर्दीचे आकर्षण अन् बेरोजगारी
लोकसंख्येच्या तुलनेत नोकऱ्यांची उपलब्धता नाही. दरवर्षी लाखो विद्यार्थी पदव्या घेऊन बाहेर पडतात. मात्र, त्यांना अपेक्षित नोकरीची संधी मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी सैन्य दल आणि पोलिस दलात भरतीसाठी प्रयत्न करतात. वर्दीच्या आकर्षणामुळेही अनेक तरुण पोलिस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून परिश्रम करतात.
यात तरी यश मिळावे..
बहुतांश उच्चशिक्षित तरुण मागास प्रवर्गामुळे वयाची सवलत मिळालेले आहेत. वयोमर्यादेमुळे यातील काही तरुणांसाठी ही अखेरची संधी आहे. त्यामुळे पोलिस भरतीत तरी यश मिळावे, अशी अपेक्षा या तरुणांना आहे.
पोलिस भरतीमधील उच्चशिक्षित
बीई - १२३
बीएड - ८
बीपीएड - ३
एलएलबी - ४
हॉटेल मॅनेजमेंट - १
बीटेक - ६६
बीसीए - ६६
बीबीए - १५
बीसीएम - ५
बीएस्सी ॲग्रीकल्चर - ६६
बी फार्म - १७
बीए - ३१३६
बीकॉम - ८७६
बीएस्सी - १०७३
१२ वी - ५७७९