जामीनदार होताना राहा सतर्क, अन्यथा तुमच्याच डोक्यावर कर्ज; सिबील स्कोअरलाही बसतो फटका
By पोपट केशव पवार | Published: January 19, 2024 05:04 PM2024-01-19T17:04:47+5:302024-01-19T17:05:05+5:30
जामीनदाराच्या मालमत्तेचाही होऊ शकतो लिलाव
पोपट पवार
कोल्हापूर : पै-पाहुणे, मित्र, कार्यालयातील सहकारी यांना कर्ज हवे असल्यास आपण त्वरित त्यांच्या कर्जाचे जामीनदार होण्यास तयारी दर्शवितो. मात्र, एखाद्याला कर्जासाठी जामीनदार होण्याचा निर्णय खूप विचारपूर्वक घेणे गरजेचे बनले आहे.
संबंधिताने कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नसल्याने जामीनदारांचा सिबील स्कोअर कमी होऊन त्यांना कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झाल्याची प्रकरणे कोल्हापूर जिल्ह्यात वाढली आहेत. अशा अनेक जामीनदारांना कर्ज मिळणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे कर्जदाराची छोटीशी चूक जामीनदाराला भोगण्याची वेळ आली आहे.
सिबीलवरही परिणाम
जर कर्जदाराने कर्ज फेडले नाही तर लोनची रक्कम जामीनदाराच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये लायबलिटी म्हणून दिसते. यामुळे जामीनदाराचाही सिबील स्कोअर खराब होतो. सिबील स्कोअर खराब झाल्यास जामीनदाराला भविष्यकाळात कर्ज घेण्याची गरज भासल्यास त्याला समस्या येऊ शकतात. कर्जदाराने हप्ते चुकविल्याने जामीनदारांचा सिबील स्कोअर कमी होऊन त्यांना कर्ज मिळण्याचे दरवाजे बंद झाल्याची प्रकरणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे एका बँक अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
किती हवा सिबीलचा स्कोअर
बहुतांश बँकांमध्ये ३०० पासून पुढे सिबीलचा स्कोअर ग्राह्य धरला जातो. जर ७०० च्या पुढे सिबील असेल तर त्याला कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण येत नाही. ७५० ते ८०० हा उत्तम स्कोअर मानला जातो. ८०० च्या पुढे सिबील असल्यास तो उत्कृष्ट ठरतो.
जामीनदाराच्या मालमत्तेचाही होऊ शकतो लिलाव
कर्जाची परतफेड करण्यात कर्जदार अयशस्वी झाल्यास कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्था जामीनदाराकडून त्याची भरपाई करतात. जर जामीनदाराने थकबाकी भरली नाही तर वित्तीय संस्थेला जामीनदाराच्या मालमत्तेचा लिलाव करून त्याचे पैसे वसूल करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कर्ज प्रकरणात जामीनदार होताना मित्र, नाते न पाहता कर्ज घेणाऱ्याची पत, त्याची आर्थिक स्थिती पाहूनच निर्णय घेणे गरजेचे बनले आहे.
जामीनदार राहिल्यास जामीनदाराची कर्ज घेण्याची क्षमता कर्ज रकमेने कमी होते. तसेच मूळ कर्जदाराने कर्ज चुकविल्यास कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी जामीनदारावर येते. पण, त्यासोबत जामीनदाराच्या क्रेडिट स्कोरवरही परिणाम होतो. यामुळे फक्त नाते-संबंध जोपासण्यासाठी जामीनदार होऊन नंतर आपले संबंध आणि पत, दोन्ही खराब करण्यापेक्षा कर्जदाराची परतफेड करण्याची क्षमता, कर्ज घेण्याचा हेतू, पैशाचा विनियोग, कर्जाच्या अटी, अशा गोष्टी तपासूनच निर्णय घ्यावा. - दीपेश गुंदेशा, सीए कोल्हापूर.
अशी आहे सिबिलची आकडेवारी
- ३०० ते ४९९ - सर्वांत कमी
- ५०० ते ६४९- सरासरी
- ६५० ते ७४९- चांगला
- ७५० ते ९००- उत्कृष्ट