कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही याची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 07:39 PM2021-06-03T19:39:14+5:302021-06-03T19:41:03+5:30
CoronaVirus Kolhapur : लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे, कोरोनामुक्तीतदेखील जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या आराखड्यातील एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर : लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे, कोरोनामुक्तीतदेखील जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या आराखड्यातील एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील सर्व प्रभाग समिती, ग्रामसमिती अध्यक्ष, प्रभाग व ग्राम समित्यांचे सर्व सदस्य, सचिव, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी त्यांनी वेबिनारद्वारे संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे प्रत्येक गावात, मनपा क्षेत्रात महा-ई-सर्व्हे सुरू करण्यात आला असून याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले असून या कामात नागरिकांनी उत्स्फूर्त साथ द्यावी.
माणगावचे राजू मगदूम, वडणगेचे सचिन चौगुले, कवठेसादच्या दीपाली भोकरे आणि बेळगुंदीचे सरपंच तानाजी रानगे यांनी कोरोनाला गावाच्या वेशीवर थोपविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपायांची माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले.