आजार होऊ नये याची काळजी घ्या : वातावरणातील बदलाचा मोठा परिणाम; दूध उत्पादनातही घट पावसाळ्यात जनावरांचे आरोग्य जपा -कृषीमंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 12:07 AM2018-08-14T00:07:07+5:302018-08-14T00:07:20+5:30
वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम जनावरांच्या वागणुकीवर, आरोग्यावर तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला निदर्शनात येतो.
वातावरणात झालेल्या बदलाचा परिणाम जनावरांच्या वागणुकीवर, आरोग्यावर तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला निदर्शनात येतो. यामुळे दूध उत्पादनात घट होऊन पशुपालकाचे आर्थिक नुकसान होते. म्हणूनच पावसाळ्यात पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेणे आवश्यक ठरते. यासाठी खालील काही गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यावे. पावसाळ््याच्या सुरुवातीलाच जून महिन्यातच जनावरांना कृमिनाशक औषधाची मात्रा द्यावी.
पावसाळ्यात हे आजार होतात
या वातावरणात आर्द्रता अधिक असल्याने विविध प्रकारच्या जीवाणू तसेच विषाणूंची, जीवाणूंची वाढ होते. जनावरे जीवाणूजन्य व विषाणूजन्य, कृमी रोगास बळी पडतात. बाजारात काही जीवाणू तसेच विषाणूजन्य रोगाविरुद्ध लसी उपलब्ध आहेत. त्यांचे पशुवैद्यकाच्या मदतीने जनावरांमध्ये योग्यवेळी लसीकरण करून घ्यावे. उदा. एकटांग्या, घटसर्प, तोंडखुरी, पायखुरी इत्यादी. पावसाळ्यात जनावरांच्या वागणुकीवर कटाक्षाने नजर ठेवावी. रोगाचे लक्षणे दिसताच पशुवैद्यकाकडून उपचार करता येईल. कृमींपासून वाचविण्यासाठी प्रत्येक पशुपालकांनी पावसाळा सुरु होण्याअगोदर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना कृमीनाशक औषधाची मात्रा द्यावी. पावसाळा संपल्यानंतर सुद्धा वर्षभर ठराविक अंदाजपत्रकानुसार कृमीनाशक औषधे देत रहावे.
जनावरांना विविध आजार हे जिवाणू, विषाणू, बुरशी आणि परजीविजन्य असतात. पावसाळ्यात बाह्यपरजीवी इ.चा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्यामुळे जनावरांना सरा, थायलेरिआॅसिस, बॅबेसिआॅसिस, तसेच लहान जनावरांमध्ये ब्लू टंग, डुकरांमध्ये जापनीज इन्सेफालायटिस इ. सारखे आजार होतात.जनावरांना लसीकरण करणे फार गरजेचे आहे. लसीकरणामुळे बऱ्याच आजारांना आपण आळा घालू शकतो. सर्व लहान-मोठ्या जनावरांमध्ये आंतरपरजिवींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जंतनाशके पाजावीत.
या वातावरणात कासेचा दाह या आजाराचे प्रमाण वाढते. यासाठी दूध काढण्यापूर्वी व काढल्यानंतर काळजी व स्वच्छता बाळगावी. दूध काढण्यापूर्वी व दूध काढल्यानंतर पोटॅशिअम परमँगनेटच्या द्रावणाने कास स्वच्छ धुवावी. जनावरांच्या विशेषत: दुधाळू जनावरांची बसण्याची जागा गोठ्यात अतिशय स्वच्छ असावी.
पावसाळ्यात वासरे बºयाच आजारांना बळी पडतात, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. लहान वासरांना पावसाळ्यात न्युमोनिया हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. यामध्ये वासरांना श्वास घेताना त्रास होतो, घसा व छातीतून श्वास घेताना खरखर असा आवाज येतो, ताप येतो. या रोगामुळे पावसाळ्यात वासरे दगावण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. वासरांना कोरड्या जागेत बांधावे. भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल अशा ठिकाणी बांधावे. स्वच्छ पाणी प्यावयास द्यावे.
या वातावरणात जनावरे माजावर येण्याचेसुद्धा प्रमाण जास्त असते. त्यामुळे माजाच्या योग्यवेळी जनावरे कृत्रिम रेतनाद्वारे फळवून घ्यावी. जनावरांचे खाद्य जेथे साठवले आहे तेथे पावसाचे पाणी येणार नाही नाही, याची काळजी घ्यावी; कारण खाद्य ओले झाल्यास बुरशी लागते. जनावरांना असा चारा दिल्यास जनावरे आजारी पडतात. त्यामुळे चारा, खाद्याची साठवणूक कोरड्या जागेवर करा.
पावसाळ्यामध्ये गवताची उगवणक्षमता तसेच वाढ अधिक प्रमाणात असते. त्यामुळे जनावरांना खायला पोटभर आणि भरपूर खाद्य मिळते.
परंतु हे जनावरांसाठी अपायकारकसुद्धा आहे. पावसाळ्यात उगवणारे गवत मऊ असल्याने जनावरे कमी वेळात अधिक गवत खातात व कोरडा चारा कमी खातात.
पावसाळ्यात गवतात पाण्याचे प्रमाण अधिक असते व तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची क्रिया बिघडते व जनावरांना हगवण लागते. म्हणून पावसाळ्यात हिरव्या गवतासोबत वाळलेला कोरडा तंतुमय चारा सुद्धा खाऊ घालणे आवश्यक असते.
भरपूर हिरव्या चाºयामुळे अपाय
पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. बरेचदा जास्त प्रमाणात चारा खाल्ल्यामुळे जनावरांना अपचन, हगवण, पोटफुगीसारखे आजार प्रामुख्याने होतात.
पावसाळ्यात जनावरांना हिरव्या चाºयासोबत वाळलेला चारा आणि पेंड द्यावी. पोटफुगीमध्ये अतिप्रमाणात कोवळे गवत खाल्ल्यामुळे त्वरित वायू तयार होतो. हा वायू पोटात जमा होतो.
त्यामुळे जनावराची डावी कुस फुगलेली आढळते, जनावर सुस्त होते, जनावर रवंथ करीत नाही, वेदना होतात, जनावराला श्वासोच्छ्ववास घेण्यास त्रास होतो. अशावेळी त्वरित जनावरांवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.
गोठ्याची स्वच्छता ठेवा
गोठ्यात हवा खेळती राहत नसेल तर विषारी वायूंची निर्मिती होऊन जनावरांच्या डोळ्यावर सूज येते, शरीराची आग होऊन खाज सुटते. यामुळे जनावर स्वस्थ राहत नाही. ओलसर वातावरणात विशेषत: कोंबड्यामध्ये कॉक्सीडायोसीस रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे गोठा नेहमी स्वच्छ आणि कोरडा ठेवावा.
गोठ्यात पावसाची झडप येणार नाही किंवा छतामधून पाणी गळणार नाही याची दक्षता घ्यावी.
गोठ्याच्या आजूबाजूला गवत किंवा झाडेझुडपे वाढू देऊ नये, असल्यास त्यांचा नायनाट करा.
आठवड्यातून दोनदा गोठा व आजूबाजूची जागा निर्जंतुकीकरण करावी. त्यामुळे माश्यांचा प्रादुर्भाव कमी होईल.
जनावरांना द्यावयाचे खाद्य पावसाने ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.
गळणाºया गोठ्यातील ओलसर व कोंदट वातावरणामुळे जनावरांच्या प्रजनन व कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
अस्वच्छता, ओलाव्यामुळे जनावरे विविध रोगांना बळी पडतात. पावसामुळे तापमान कमी असले, तरी हवेतील आर्द्रता वाढते. त्यामुळे वातावरणात ओलसरपणा कायम राहतो. अशा वातावरणात सूक्ष्म जिवाणू व बुरशीची वाढ चांगली होत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते.
गोठ्यात खड्डे ताबडतोब ते मुरूम टाकून बुजवावेत. मलमूत्राचा योग्य निचरा करावा. यासाठी गोठ्यात थोडा उतार करावा.
जमीन कोरडी करण्यासाठी चुन्याची पावडर, गव्हाच्या किंवा ज्वारीच्या तुसात मिसळून त्याचा पातळ थर गोठ्यात अंथरावा, यामुळे हवेतील आर्द्रता शोषून घेण्यास मदत होईल पावसाळ्यात जीवजंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे जनावरांना स्वच्छ ठेवणे, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे.
प्रा. शरद जिनगोंडा पाटील
पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय, कोल्हापूर