सावध रहा.. घरीच रहा.. अन्यथा रेल्वेमध्ये होणार आता क्वॉरंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 10:35 AM2020-04-27T10:35:56+5:302020-04-27T13:01:29+5:30
प्रवीण देसाई - कोेल्हापूर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे विभागाने क्वारंटाईन (विलगीकरण) कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली ...
प्रवीण देसाई -
कोेल्हापूर : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रेल्वे विभागाने क्वारंटाईन (विलगीकरण) कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामध्ये पुणे येथे कोल्हापूरसाठी १८ डब्यांच्या रेल्वे सज्ज असून यामध्ये १६२ बेड तयार केले जात आहेत. जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यास ही रेल्वे केव्हाही कोल्हापुरात दाखल होऊ शकते.
कोरोनाच्या संकटात देशासह संपूर्ण जग सापडले आहे. रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यासाठी सरकारी हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलमध्येही आयसोेलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षासाठी बेडची तयारी ठेवली जात आहे. त्याचबरोबर सरकारी वसतिगृहे, विद्यापीठ, शाळांमध्येही बेडची व्यवस्था केली जात आहे. हा प्रादुर्भाव वाढल्यास या इमारतीही कमी पडू शकतात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या डब्यांमध्ये क्वारंटाईन व आयसोलेशन कक्षासाठी तयारी ठेवली आहे. देशभरात हे चित्र आहे. पुणे मध्य रेल्वे विभागातही हालचाली सुरू असून रेल्वेच्या डब्यात क्वारंटाईन कक्ष तयार करायला सुरुवात झाली आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूर रेल्वे स्टेशन कार्यालयाकडून माहिती मागविण्यात आली होती. त्याचबरोबर स्टेशनमधील रेल्वेचे काही डबेही पुण्याला नेण्यात आले होते. त्यानुसार पुणे येथील वर्कशॉपमध्ये कोल्हापूरसाठी क्वारंटाईनकरिता १८ डब्यांच्या रेल्वेत १६२ बेड तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून मागणी झाल्यास १२ ते १४ तासांत पुण्याहून कोल्हापुरात ही रेल्वे दाखल होऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
‘रेल्वे’चा प्रशासनाला मदतीचाच हात
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉस्पिटलसह इमारतींमध्येही जागा अपुरी पडू शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आपल्या पातळीवर डब्यांमध्ये क्वारंटाईन कक्ष तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या माध्यमातून ‘रेल्वे’ने शासन व प्रशासनाला मदतीचाच हात दिला आहे.
एका डब्यात नऊ बेड
एका रेल्वे डब्यात नऊ बेड याप्रमाणे १८ डब्यांमध्ये १६२ बेड तयार केले जात आहेत. आयसोेलेशन कक्ष व क्वारंटाईन कक्षामध्ये लागणाऱ्या व्हेंटिलेटरसह वैद्यकीय साहित्य ठेवण्याची व्यवस्था या कक्षांमध्ये केली जात आहे, असे सांगण्यात आले.