सावधान, गवे गावातच येताहेत! वनविभाग हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 11:49 PM2018-03-28T23:49:01+5:302018-03-28T23:49:01+5:30
धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल
धामोड : बुरंबाळी-कानकेकरवाडी दरम्यानच्या दुर्गमानवाड रस्त्यावर मंगळवारी सकाळीच १२ ते १३ गव्यांचा एक कळप दिसल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. या सर्व प्रकारामुळे वनविभागही हतबल झाला असून, ठोस उपायासाठी शेतकरीही आक्रमक झाला आह.
बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील कानकेकरवाडी ते दुर्गमानवाड रस्त्यावरती मंगळवारी सकाळी जवळपास १३ गव्यांचा कळप येथील शेतकऱ्यांना दिसला. गवे गावच्या शिवारात आल्याची बातमी केळोशी (खुर्द), खातकरवाडी, पिंपरेचीवाडी, बुरंबाळी गावांतील ग्रामस्थांना समजताच त्यांनी डोंगरमाथ्यावरील या रस्त्याकडे धाव घेतली; पण काही वेळातच या कळपाने शिरगाव, कांबळवाडी, तरसंबळे शिवारमार्गे दुर्गमानवाड जंगलाच्या दिशेने पळ काढला.
या परिसरातील जंगलांना गेल्या चार ते पाच दिवसांपासून आगी लावण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने जवळपास ९०० एकरांवरील जंगल आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. त्यामुळे हे गवे चाºयाच्या शोधात आता गावशिवाराच्या दिशेनेच येत
आहेत. या परिसरातील शेतकरी रात्रीच्यावेळी उसाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेल्यावर त्यांना वेळोवेळी गव्यांचे दर्शन गेल्या १५ दिवसांपासून होत आहे. परिणामी, शेतकरी भीतीपोटी पाणी अर्धवट सोडूनच घरी धाव घेत आहेत. गव्यांनी फस्त केलेले पीक पाहून शेतकरी निराशही होत आहेत.
हल्ल्याच्या भीतीने गावकऱ्यांमध्ये दहशत
मोहितेवाडी येथील शेतकरी गेल्या सहा महिन्यांपूर्वी गव्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा गव्यांनी गावच्या दिशेने मोर्चा वळविल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाला आहे.
शेतकऱ्यांनी गव्यांना शेतात येण्यापासून रोखण्यासाठी गावठी जनावरांचे मलमूत्र किंवा गोणपाटामध्ये खराब मिरच्या घालून त्याची धुरांडी होईल, अशा पद्धतीने शेताच्या बांधावरती ठेवावे, त्यामुळे गवे शेतात येणार नाहीत. - दिनेश टिपुगडे, वनरक्षक केळोशी, म्हासुर्ली.