जातीवाचक नावे बदलताना काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:17 AM2021-06-24T04:17:26+5:302021-06-24T04:17:26+5:30
कोल्हापूर : गावे, वाड्या-वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देताना वाद निर्माण होऊ ...
कोल्हापूर : गावे, वाड्या-वस्त्या व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देताना वाद निर्माण होऊ नये याची काळजी घ्या, शासनस्तरावर ज्या महापुरुषांची जयंती साजरी केली जाते त्यांचीच नावे परिसराला देण्यात यावी, तसेच या नाव बदलाबाबत माहिती गोळा करावी सूचना जिल्हाधिकारी दौलत दसाई यांनी बुधवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, समाजकल्याण आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, जिल्हा प्रशासन अधिकारी दीपक पाटील उपस्थित होते.
यावेळी अजयकुमार माने यांनी जातीवाचक नाव बदलण्यासाठी गावाने तसा ठराव करून प्रस्ताव गटविकास अधिकाऱ्यांकडे त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे व त्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावा लागेल, अशी माहिती दिली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामुळे ग्रामसभा होत नसल्याने सध्याच्या काळात किती नावे बदलता येतील याची माहिती गोळा करावी, ज्या बाबींमध्ये जातीवाचक नावे आढळून येत नाहीत अशा प्रकरणांची माहिती संबंधित विभागाला द्यावी व त्यावर शासनाकडून मार्गदर्शन घ्यावे, अशी सूचना केली.
--
फोटो नं २३०६२०२१-कोल-समाज कल्याण बैठक
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जातीवाचक नाव बदलासंबंधीची बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.