ऑनलाईन जोडीदार शोधताना सावधान; हात पिवळे होण्याआधीच खिसा रिकामा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:29 AM2021-09-16T04:29:36+5:302021-09-16T04:29:36+5:30
कोल्हापूर : समाज माध्यमांवरील वेबसाईट, फेसबुक पेज अशा विविध माध्यमांद्वारे आपण आयुष्याचा जोडीदार निवडत असाल, तर सावधगिरीने पाऊल ...
कोल्हापूर : समाज माध्यमांवरील वेबसाईट, फेसबुक पेज अशा विविध माध्यमांद्वारे आपण आयुष्याचा जोडीदार निवडत असाल, तर सावधगिरीने पाऊल उचला. कारण या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या संख्येने होत असून, क्षणार्धात तुमचा बँक बॅलन्स झिरो होऊ शकतो. शिवाय ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकाराला सामोरे जावे लागते.
‘लग्न पाहावे करून आणि घर बघावे बांधून’ असे म्हणतात. याचे कारणच हे की या दोन्ही गोष्टी सहजगत्या होत नाहीत. त्यात सध्याच्या वाढत्या अपेक्षांच्या काळात लग्न जुळणे ही तर महाकठीण बाब झाली आहे. मुलगा-मुलगी कितीही सुंदर, देखणे, गलेलठ्ठ पगाराचे असो, घरी आर्थिक सुबत्ता असो; पण कुंडलीसह सगळ्या बाबी जुळून लग्न व्हायला आणि पुढे सुरळीत संसार सुरू होईपर्यंत काही खरे नसते. लग्न जुळविण्याचे काम पूर्वी त्या त्या समाजातील ज्येष्ठ मंडळी, मध्यस्थ आणि नातेवाईकांकडून केले जायचे. पण आता यासाठी कुणाकडे तेवढा वेळही नाही; शिवाय मुला-मुलींच्या अपेक्षा बदलल्या आहेत. ऑनलाईन माध्यमातून अधिक चांगली स्थळे मिळतात. यामुळे आता सोशल साईट्सवर पालक किंवा इच्छुक वधू-वर छायाचित्रासह आपली सगळी माहिती या साेशल साईटवर अपलोड करतात. नंतर काही दिवसांनी स्थळ सांगण्याच्या बहाण्याने एखाद्या एजंटाचा किंवा त्याच व्यक्तीचा वारंवार फोन येतो, ओळख वाढते. विश्वास निर्माण होतो. खासगी बाबी सांगितल्या जातात, नातं पुढे जाते, त्यातून ब्लॅकमेलिंगचे प्रकार सुरू होतात. बँक खाते, आधार नंबर, फोन नंबर, ई-मेलच्या माध्यमातून क्षणार्धात खात्यावरील बॅलन्स शून्य होतो. पुढे कधीही त्या व्यक्तीचा फाेन नंबर लागत नाही आणि तोपर्यंत आपली फसवणूक झालेली असते. खोटी माहिती दिली जाते, व्हर्च्युअल ओळखीतूनच विवाह होतो. प्रत्यक्ष संसार सुरू झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते. असे अनेक प्रकार सध्या घडत आहेत.
---
अशी होऊ शकते फसवणूक
- मुलगा-मुलीच्या मनात विश्वास निर्माण केला जातो, चॅटिंग सुरू होते, समोरची व्यक्ती कौटुंबिक, आर्थिक अडचणी मांडायला सुरू करते, पैशासाठी गळ घातली जाते, भावनेच्या भरात मदत केली जाते. पुढे त्या व्यक्तीचा फोन नॉटरिचेबल. यात मध्यस्थांचाही समावेश असतो.
- छान मैत्री झाली की विश्वासाने खासगी गोष्टी सांगितल्या जातात. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, नातं पुढं जातं, मग पैशासाठी, संबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेलिंग सुरू होते.
- सोशल साईटवरील छायाचित्रांचा आधार घेऊन अश्लील छायाचित्रे बनवली जातात. त्या माध्यमातून बदनामी केली जाते.
- वेगवेगळ्या स्कीम, प्रलोभने, भेटवस्तूंचे आमिष दाखवून क्षणार्धात बँक बॅलन्स शून्य केला जातो.
- मुलगा-मुलीकडून अनेकदा खोटी व चुकीची माहिती दिली जाते. सगळी बोलणी व्हर्च्युअल पद्धतीने होते. चौकशी, शहानिशा केली जात नाही. विवाहानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.
----
ही घ्या काळजी...
- ऑनलाईन नोंदणी करताना अधिकृत संस्थेच्या वेबसाईटचीच निवड करा. आपली माहिती गोपनीय राहील, याची खात्री करा.
- समाजमाध्यमांवर फोटोसेशन केलेली छायाचित्रे टाकू नका.
- आधारकार्ड, बँकडिटेल्स, पॅन नंबर, बँक खात्यांशी संबंधित मेल आयडी, कौटुंबिक पार्श्वभूमी अशी खासगी माहिती अपलोड करू नका.
- व्हर्च्युअल ओळख झाल्यानंतर प्रत्यक्ष ती व्यक्ती आणि कुटुंबियांची भेट घ्या, मुलगा कोणत्या कंपनीत काम करतो, तिथे त्याची काय इमेज आहे, पगार, कॉन्ट्रॅक्ट, व्यवसाय असेल तर नोंदणीकृत आहे का, वार्षिक उलाढाल, कौटुंबिक पार्श्वभूमी या सगळ्याची चौकशी, उलट तपासणी घ्या.
- आपल्या आयुष्यातील चांगल्या-वाईट घटना अनोळखी व्यक्तींना सांगू नका.
- एखादी व्यक्ती खूपच प्रलोभने देत असेल, आर्थिक बाबीत गळ घालत असेल, सार्वजनिक ठिकाणी भेटणे टाळत असेल, वारंवार मोबाईल नंबर बदलत असेल, नवनवीन मेलआयडी काढत असेल, प्रत्यक्ष भेटण्यास नकार देत असेल, तर समजून जा की दाल में कुछ काला है...
---