भ्रष्टाचारमुक्तीसाठी कॅशलेस व्हा
By admin | Published: March 16, 2017 12:50 AM2017-03-16T00:50:56+5:302017-03-16T00:50:56+5:30
डिजिधन मेळाव्यात सुभाष भामरे यांचे आवाहन : महाराष्ट्रासाठी अनेक उपक्रम राबविणार - चव्हाण
कोल्हापूर : राष्ट्राला समृद्ध करण्यासाठी कॅशलेस व्यवहार अनिवार्य आहेत. या व्यवहारातून भ्रष्टाचारमुक्त, पारदर्र्शी कारभार करून देशाला एक सक्षम राष्ट्र म्हणून विकसित करण्यासाठी नागरिकांनी आजपासूनच ही पद्धती अवलंबावी, असे आवाहन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी बुधवारी येथे केले.
कसबा बावडा रोडवरील महासैनिक दरबार हॉल येथे जिल्हा प्रशासनातर्फे रोखरहित (कॅशलेस) व्यवहाराबाबत लोकांना माहिती मिळण्यासाठी आयोजित डिजिधन मेळाव्यात ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, नीती आयोगाचे संचालक अनिलकुमार शर्मा, माहिती तंत्रज्ञान विभागाचे संचालक एम. जी. अजीजुद्दीन, नॅशनल पेमेंट कॉर्र्पोरेशनचे उपाध्यक्ष महेंद्र जोशी, आदींची होती.
डॉ. भामरे म्हणाले, केंद्र शासनाने नोटाबंदीच्या निर्णयानंतर रोखरहित व्यवहाराला प्राधान्य दिले असून, त्या दृष्टीने सुविधाही उपलब्ध करून दिल्या आहेत. देशातील जनतेला रोखरहित पद्धतीची माहिती व्हावी, यासाठी केंद्र शासनाने देशातील १०० जिल्ह्यांची डिजिधन मेळाव्यांसाठी निवड केली आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट सिस्टीम लोकांना समजून सांगितली जात आहे.
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, रोखरहित महाराष्ट्र बनविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक उपक्रम आणि सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात नजीकच्या काळात ३० हजारांपेक्षा अधिक ‘पॉस’ मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र खाडे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. जी. किणिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषिविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार उत्तम दिघे, गणेश शिंदे, आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सोडत
रोखरहित योजनेमध्ये अधिकाधिक ग्राहक आणि व्यापाऱ्यांचा सहभाग घेण्यासाठी ‘लकी ग्राहक योजना’ व ‘डिजिधन व्यापार योजना’ हे महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. या योजनेची देशपातळीवरील सोडत डिजिधन मेळाव्यात संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यामध्ये देशात रुपे कार्डाद्वारे व्यवहार करणाऱ्या ११,६५० विजेत्या ग्राहकांचे, ‘आधार’द्वारे व्यवहार करणाऱ्या २८५१ विजेत्यांचे, यूपीआयद्वारे व्यवहार करणाऱ्या ४९२ व यूएसएसडीद्वारे व्यवहार करणाऱ्या सात लकी विजेत्यांचे क्रमांक काढण्यात आले.
हणबरवाडी, नागावचा गौरव
जिल्ह्यातील कॅशलेस गाव म्हणून जाहीर झालेल्या हणबरवाडी व नागाव या गावांच्या सरपंच व सदस्यांचा मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून घेण्यात आलेल्या स्लोगन, जिंगल्स, पोस्टर्स स्पर्धेतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमास सेलिब्रिटी म्हणून उपस्थित राहिल्याबद्दल बुद्धिबळपटू ऋचा पुजारी, नेमबाज राधिका बराले, जितेंद्र विभूते आणि अनुष्का पाटील यांचाही गौरव करण्यात आला.
१४ एप्रिलला होणार नऊ लाख बक्षिसांचे वितरण
लकी ग्राहक योजना व डिजिधन व्यापार योजनेंतर्गत १४ एप्रिलला देशस्तरावरील सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये नऊ लाख २० हजार ग्राहक, तर ५६ हजार व्यावसायिकांना बक्षिसे वाटली जाणार आहेत, असे डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.
...तर ४०० कोटींचा अपव्यय टळेल
राज्यातील सर्व रेशन दुकाने ‘पॉस’ मशीनच्या माध्यमातून जोडली जाणार आहेत. जोपर्यंत ग्राहक आपल्या अंगठ्याचा ठसा देणार नाहीत, तोपर्यंत रेशनचे धान्य मिळणार नाही. या पद्धतीमुळे सुमारे ४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा अपव्यय टळेल. सरकारी कर, पाणी बिले ‘आपले सरकार’ या अॅपच्या माध्यमातून भरता येतील. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल, असे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
३५ ग्रामपंचायती होणार ‘लेसकॅश’
जिल्ह्यात ७.५० लाख जनधन बँक खाती आहेत. त्यांपैकी सहा लाख खाती आधार लिंक करून त्यांना रुपे कार्डे देण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायती लेसकॅश झाल्या असून, येत्या १५ दिवसांत आणखी ३५ ग्रामपंचायती लेसकॅश होतील, असा विश्वास जिल्हाधिकारी सैनी यांनी व्यक्त केला.