जनतेच्या विश्वासास पात्र राहू : आबिटकर

By Admin | Published: November 3, 2014 11:37 PM2014-11-03T23:37:42+5:302014-11-04T00:24:34+5:30

राधानगरीत सत्कार : लबाडांना घरी बसवण्यासाठी मदत : पी. डी. धुंदरे

Be eligible for public confidence: Abitkar | जनतेच्या विश्वासास पात्र राहू : आबिटकर

जनतेच्या विश्वासास पात्र राहू : आबिटकर

googlenewsNext

राधानगरी : सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने प्रचंड मताधिक्याने मला आमदार केले. लोकांनी टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून चांगले काम करून दाखवेन, असे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
राधानगरी तालुक्यातील सर्वपक्षीयांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे होते. धुंदरे यांच्या हस्ते आमदार आबिटकर यांचा सत्कार करण्यात आला.
आबिटकर म्हणाले, माजी आमदार के. पी. पाटील यांनी केवळ स्वत:चे व पै-पाहुण्यांचे हितसंबंध सांभाळण्यासाठी पदाचा गैरवापर केला. यामुळेच जनतेने त्यांना धडा शिकविला. त्यांच्या तावडीतून अन्य सत्तास्थाने सोडविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करून मला मदत करणाऱ्यांना ताकद देईन.
धुंदरे म्हणाले, लबाड आमदारांना घरी बसविण्यासाठीच काँग्रेसने आबिटकर यांना पाठबळ दिले. पक्षभेद विसरून कार्यकर्त्यांनी मदत केली. भविष्यात त्याचा विसर पडणार नाही याची दक्षता घ्या.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगले म्हणाले, भ्रष्टप्रवृत्ती विरोधातील एकजूट कायम ठेवून ती समूळ नष्ट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न सुरूच राहतील.
अभिजित तायशेटे, सुप्रिया साळोखे, सुभाष पाटील, सत्यजित जाधव, अ‍ॅड. बी. जी. खांडेकर, संदीप डोंगळे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
हिंदुराव साळोखे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मारुतीराव जाधव, दिनकरराव जाधव, तानाजी चौगले, राजेंद्र लोखंडे, बंडा वाडकर यांची भाषणे झाली. सदाशिव चरापले, उदय पाटील, विजय मोरे, बी. एस. देसाई, मधुकर देसाई, कल्याणराव निकम, जयसिंग खामकर, नंदकिशोर सूर्यवंशी, रमेश पाटील, संभाजी आरळे यांच्यासह प्रमुख नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रणशिंग फुकले !
आगामी जिल्हा बँक, गोकुळ, बाजार समिती तसेच बिद्री व भोगावती कारखान्यांतही राष्ट्रवादी विरोधात रणशिंग फुंकल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

संयोजकांकडून माफी
कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवरील नावावरून दोन दिवस मोठा असंतोष पसरला होता. अनेकांची नावे वगळल्याने त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यामुळे संयोजकांना माफी मागावी लागली.

Web Title: Be eligible for public confidence: Abitkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.