‘बेबी शकुंतला’ यांच्या कार्याचा ठसा चिरंतर राहो
By admin | Published: January 31, 2015 12:22 AM2015-01-31T00:22:24+5:302015-01-31T00:25:07+5:30
चंद्रकांत जोशी : पन्नाशीच्या दशकातील ‘चिमणी पाखरं’ हा चित्रपट प्रदर्शित करून अनोखी श्रद्धांजली
कोल्हापूर : बेबी शकुंतला यांनी गेली पन्नास वर्षे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांबरोबर ठेवलेला स्नेह, जिव्हाळा व कर्तृत्वाचा ठसा त्यांच्या निधनानंतरही असाच चिरंतर राहो, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी केले.
ज्येष्ठ अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी नाडगौंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी भालजी पेंढारकर, सांस्कृतिक केंद्र, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ, बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी, सिने एक्झिहिबिटर्स असोसिएशन यांच्या वतीने शाहू स्मारकात आज, शुक्रवारी श्रध्दांजली सभेत ते बोलत होते.
जोशी म्हणाले, बेबीताई यांनी दामलेमामांच्या आग्रहास्तव चित्रपटात प्रवेश केला. त्यांच्यावर ‘प्रभात युग’चा स्नेह, जिव्हाळा व निखळ वृत्ती यांचा प्रभाव होता. त्यांनी १९५४ नंतर चित्रपटात काम करण्याचे बंद केले. मात्र कलाकारांप्रती स्नेह, जिव्हाळा कायम ठेवला. नाडगौंडे कुटुंबीयांतर्फे वर्षा नाडगौंडे यांनी बेबी शकुंतला यांच्या सहवासातील आठवणी जाग्या केल्या. यावेळी चित्रपट महामंडळाचे कार्यवाह सुभाष भुर्के, ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर, चंद्रकांत कारेकर, दिलीप बापट, श्रीकांत डिग्रजकर, हेमसुवर्णा मिरजकर , बेबी शकुंतला याचे चिरंजीव सुरेश नाडगौंडे, मुलगी तेजस्विनी भोसले, नातू कौस्तुभ, केदार, नात रितीका, अमृता , प्रणाली, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आठवणींना उजाळा...
पन्नाशीच्या दशकात तयार झालेल्या व अनंत माने प्रमुख निर्मित ‘चिमणी पाखर’ हा कृष्णधवल मराठी चित्रपट दाखविण्यात आला. या चित्रपटातील बेबी शकुंतला यांची ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या मुलीची व्यक्तीरेखा सर्वांना आजही भावून जाणारी होती. उपस्थितांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही त्या काळातील आठवणींना उजाळा मिळाला.