स्वत:ला सिद्ध करण्याची तयारी ठेवा
By admin | Published: March 11, 2016 12:25 AM2016-03-11T00:25:07+5:302016-03-12T00:10:58+5:30
देवानंद शिंदे : शासकीय तंत्रनिकेतनकडून ८३१ स्नातकांना पदविका प्रदान
कोल्हापूर : भूतकाळ मागे सोडून मोठे ध्येय, मोठी आव्हाने स्वत:समोर ठेवा. त्यांच्या पूर्ततेसाठी मनापासून प्रयत्न करा. स्वत:ला सिद्ध करण्याची तयारी ठेवा. आयुष्यात भूतकाळ एकच असतो; पण भविष्य घडविण्याच्या संधी अगणित असतात, हे लक्षात ठेवून कार्यरत राहा, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गुरुवारी येथे केले.
येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या २१ व्या पदविका प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तंत्रनिकेतनच्या खुल्या सभागृहातील कार्यक्रमास तंत्रनिकेतनच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष किरण पाटील, परीक्षा नियंत्रक ए. एच. मुधोळकर प्रमुख उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, सध्याच्या ज्ञानयुगातील कामाचे स्वरूप वेगळे आहे. त्यातून वेगळ्या उद्योग-व्यवसायांच्या संधी निर्माण झाल्या असून वैशिष्ट्यपूर्ण कौशल्ययुक्त मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने कालसुसंगतपणे तंत्रनिकेतनची वाटचाल सुरू आहे. पदविकाधारक विद्यार्थी-विद्यार्थिनी या आजपासून खुल्या संधीच्या अवकाशात प्रवेश करीत आहेत. लौकिक अर्थाने त्यांचे शिक्षण समाप्त होत असले तरी त्यांनी शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असल्याचे लक्षात ठेवून जीवनात वाटचाल करावी. कार्यक्रमात प्रमुख उपस्थितांच्या हस्ते आकाश करपे, परशराम पाटील, प्रतीक लंबे, तुषार फाटक, आशिष हातकर, प्रांजल पाटील या स्नातकांना प्रातिनिधिक स्वरूपात पदविका प्रदान करण्यात आल्या. यावेळी नियामक मंडळाचे सदस्य ए. बी. पर्वते-पाटील, विक्रमसिंग शिंदे, उपप्राचार्य ए. के. उपाध्याय, शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, आदी उपस्थित होते. प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी अहवाल वाचन केले. आनंद राजमाने यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्वत सभा सदस्यांची मिरवणूक काढण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण होते. अनेकांनी पदविका मिळाल्याचा आनंद मित्र-मैत्रिणींसमवेत सेल्फी घेऊन व्यक्त केला. कम्युनिटी डेव्हलपमेंटअंतर्गत डिजिटल कॅमेरा व फोटोग्राफी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यास गर्दी झाली होती.
यंत्र अभियांत्रिकीचे सर्वाधिक स्नातक
स्थापत्य अभियांत्रिकी (१५२), यंत्र अभियांत्रिकी (१९५), विद्युत अभियांत्रिकी (६७), औद्योगिक अणुविद्युत (५५), अणुविद्युत व दूरसंचार (११०), शर्करा उत्पादन तंत्र (१२), माहिती तंत्रज्ञान (४९), धातू अभियांत्रिकी (३२), कम्युनिटी कॉलेज १५९ अशा ८३१ स्नातकांना पदविका प्रदान करण्यात आल्या.