लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाला तयार रहा, सतेज पाटील यांचे आवाहन

By पोपट केशव पवार | Published: November 20, 2023 04:27 PM2023-11-20T16:27:27+5:302023-11-20T16:28:13+5:30

'आयटक'च्यावतीने शाहूनगरी ते दीक्षाभूमी महासंघर्ष यात्रेला प्रारंभ, १८ डिसेंबरला ही यात्रा नागपूरला पोहोचणार

Be prepared to fight to preserve democracy, MLA Satej Patil appeal | लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाला तयार रहा, सतेज पाटील यांचे आवाहन

छाया-नसीर अत्तार

कोल्हापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेने देशाला प्रबळ केले. मात्र, हीच घटना मोडीत काढण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. आपण याविरोधात काहीच केले नाही तर कदाचित २०२४ च्या देशातील शेवटच्या निवडणुका ठरतील. त्यामुळे या देशातील लोकशाही टिकवायची असेल तर आपण सर्वांनी एकजुटीने याविरोधात संघर्ष करू या, असे आवाहन माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी केले. 

ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसतर्फे (आयटक) शाहूनगरी ते दीक्षाभूमी अशी महासंघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेला कोल्हापुरातील गोविंद पानसरे यांच्या स्मारकाजवळ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला प्रारंभ झाला. या वेळी आयटकच्या पदाधिकाऱ्यांनी 'भाजप हटाव, देश बचाव' या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. १८ डिसेंबरला ही यात्रा नागपूरला पोहोचणार असून येथे हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चाद्वारे तिचा समारोप होईल.

सतेज पाटील म्हणाले, सरकारने लागू केलेली जीएसटी सामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. जाती-जातीत तणाव निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे या सरकारविरोधात प्रचंड असंतोष असून त्यासाठी 'भाजप हटाव, देश बचाव' हा नारा अधिक बुलंद करायला हवा. सरकारने उद्योगपतींची १४ हजार कोटींची कर्जे माफ केली, पण सर्वसामान्य माणसांना कोणताच आधार दिला नाही. घटना आता धोक्यात आली आहे.

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, लोकशाही टिकवण्यासाठी भाजपला सत्तेवरून हटविणे गरजेचे आहे. आयटकचे जनरल सेक्रेटरी शाम काळे म्हणाले, आमचा वसा आणि वारसा शाहू महाराज आहेत. त्यामुळे देश वाचवण्यासाठी शाहूनगरीतून ही यात्रा काढली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, सुभाष लांडे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सी. एन. देशमुख, भारती पोवार, प्रकाश बनसोडे, राजू देसले, बबली रावत, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, कृष्णा भोयर उपस्थित होते. शाहीर सदाशिव निकम यांनी स्वागत केले. एस. बी. पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Be prepared to fight to preserve democracy, MLA Satej Patil appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.