महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज रहा : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:12+5:302020-12-13T04:37:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाचे शनिवारी शाहू मार्केट यार्ड येथील कागल संघाच्या इमारतीत स्थलांतर झाले, त्यावेळ ते बोलत होते. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मंत्री मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जाऊन काम करावे. कोल्हापूर महापालिकेत गेली पंधरा वर्षे आपण सत्तेत आहोत. त्यामुळे निवडणूक ताकदीने लढवायची आहे, त्यासाठी प्रभागनिहाय नियोजन करा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे प्रभागात फिरत असल्याचे ऐकले. पदवीधर व शिक्षक मतदारसंघात जो निकाल लागला, त्या चटक्यातून सावरण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.
जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील, अशोकराव जांभळे, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, राजेश लाटकर, रामराजे कुपेकर, जयकुमार शिंदे, आदी उपस्थित होते.
भाजपची डिपॉझिट जप्त होईल
कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रित लढावी, अशी अपेक्षा श्रेष्ठींची आहे. मात्र, स्थानिक विचार करता अडचणी असल्याने निवडणुकीनंतर आम्ही एकत्र येऊ. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजपची डिपॉझिट जप्त होईल, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
दोन्ही काँग्रेसमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न
युपीएच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यापूर्वीच खुलासा केला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहीती देऊन काँग्रेस व राष्ट्रवादीत भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, युपीएमध्ये शिवसेनेने यावे, यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
म्हणूनच सरपंच आरक्षण लांबणीवर
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगोदर सरपंच आरक्षण काढले तर संबंधित आरक्षणाच्या प्रभागात चुरस व ईर्षा निर्माण होते. वारेमाप पैसा खर्च होतोच, त्याचबरोबर चुकीचे दाखले काढले जातात. पडताळणीमध्ये अवैध ठरल्यानंतर पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागते. यासाठी सरपंच आरक्षण लांबणीवर टाकल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
- राजाराम लोंढे