शेतकरी विरोधी कुटील कारस्थान हाणून पाडण्यासाठी सज्ज रहा, राजू शेट्टींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 05:28 PM2022-09-02T17:28:56+5:302022-09-02T17:30:57+5:30
शेतकरी विरोधी हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार
अनिल पाटील
सरुड : इथेनॉल निर्मितीमुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले असतानाही शासन व साखर कारखानदारांनी एकरक्कमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तुकडे पाडण्याचे व ऊसाला अपेक्षीत दर न देण्याचे कुटील कारस्थान रचले आहे. त्यामुळे भविष्यात हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी शेतकऱ्यांनी टोकाच्या संघर्षासाठी सज्ज रहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. गावांच्या संपर्क दौऱ्याप्रसंगी सरुड येथे बोलताना त्यांनी हे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, उत्पादन खर्च पाहता २०१९ नंतर ऊस दरामध्ये अपेक्षित अशी दरवाढ झाली नाही. वास्तविक रासायनिक खते, मशागत खर्च, कीटक, तसेच तणनाशकांचा खर्च आदी खर्चामध्ये महागाईमुळे प्रचंड वाढ होऊन उत्पादन खर्च वाढला असताना त्या प्रमाणात ऊस दरामध्ये वाढ करणे गरजेचे होते. परंतु शासन तसेच साखर कारखानदारांकडून त्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.
उलट एकरक्कमी एफआरपी देण्याऐवजी त्याचे तीन तुकडे पाडण्याचे कुटील कारस्थान सुरु आहे. शेतकरी विरोधी हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढकार घेणार असून संघटनेच्यावतीने लवकरच प्रत्येक गावा गावात सभा घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उसाला प्रतिटन सातशे ते नऊशे रुपये जादा मिळावेत
साखर कारखान्यांकडून उत्पादित होत असलेल्या इथेनॉलच्या दरात वाढ झाल्याने सध्या इथेनॉलला चांगला दर मिळत आहे. इथेनॉलला मिळणारा हा दर पाहता साखर कारखान्यांना ऊसाला सध्या देत असलेल्या दरापेक्षा अधिक ७०० ते ९०० रु पर्यंत जादा दर देण्यास काही अडचण नाही असेही शेट्टी यांनी यावेळी मुद्यासह पटवुन सांगितले.