मानवसेवा करणाऱ्यांच्या पाठीशी रहा
By Admin | Published: January 31, 2015 12:20 AM2015-01-31T00:20:47+5:302015-01-31T00:24:48+5:30
विजय कुवळेकर : गडहिंग्लज येथे पंढरीनाथ सावंत, अनंतराव आजगावकर यांचा गौरव
गडहिंग्लज : स्वत:च्या स्वार्थापलीकडे बघणाऱ्या व तपस्वीवृत्तीने समाजाच्या भल्यासाठी झटणाऱ्यांमुळेच समाज घडतो. त्यामुळे अशा मानवसेवकांना समाजाने पाठबळ देण्याची, त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी आज, शुक्रवारी केले.येथील सुभाष धुमे सेवा प्रतिष्ठानच्या सातव्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. आदर्श पत्रकार पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचा, तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर यांचा प्रतिष्ठानतर्फे गौरव करण्यात आला.कुवळेकर म्हणाले, लालसा व भोगाच्या हव्यासामुळे माणुसकी कमी होत चालली आहे. भौतिक प्रगती झाली तरी नैतिकतेची कमतरता भासत आहे. अशावेळी शाश्वत मूल्यांशी ठाम राहून काम करणाऱ्यांची समाजाला गरज आहे. सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, असा समज अलीकडे रूढ होत चालला आहे. त्यामध्ये विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकले जाणाऱ्यांचा दोष आहे. त्यासाठी स्वत:ची निष्ठा आणि धारणा ठाम असावी.
यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, सुभाष धुमे, पंढरीनाथ सावंत यांचीही भाषणे झाली. तहसीलदार हनुमंत पाटील, प्राचार्य जे. बी. बारदेस्कर, राजेंद्र गड्यान्नावर, विलासराव बागी, अमरनाथ घुगरी, उज्ज्वला दळवी, नरेंद्र भद्रापूर, डॉ. विवेक पाटणे, ज्योती देशपांडे, अनुराधा पाटणे, आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कोळकी यांनी स्वागत केले. प्रा. स्वाती कोरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुभाष कोरे यांनी मानपत्रांचे वाचन, सदानंद पुंडपळ यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. पी. डी. पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)
गांधीजींना श्रद्धांजली..!
साधी राहणी व हयातभर पारदर्शक जीवन जगणाऱ्या आजगावकर सरांनी तपस्वी वृत्तीने समाजाची सेवा केली. त्याच भावनेतून धुमे व पंढरीनाथांनी पत्रकारिता केली. गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी त्यांचा गौरव झाला, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली आहे, असेही कुवळेकरांनी आवर्जून नमूद केले.
नागरी सत्कारास नकार
शासनाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल कुवळेकर यांचा मेमध्ये गडहिंग्लजला नागरी सत्कार करण्याचा मानस धुमे यांनी जाहीर केला. मात्र, त्यास कुवळेकर यांनी नम्रपणे नकार दिला. यावेळी श्रमिक पत्रकार संघ आणि बेळगाव मराठी पत्रकार संघातर्फे त्यांचा प्रा. पी. डी. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला.