सहकारातील दीपस्तंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:23 AM2021-04-01T04:23:54+5:302021-04-01T04:23:54+5:30

शिरोळ : शिरोळ तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा चौफेर सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणारे श्री दत्त उद्योग ...

The beacon of cooperation | सहकारातील दीपस्तंभ

सहकारातील दीपस्तंभ

Next

शिरोळ : शिरोळ तालुक्याच्या सामाजिक, राजकीय, सहकार, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा चौफेर सर्वांगीण विकासासाठी हातभार लावणारे श्री दत्त उद्योग समूहाचे आधारस्तंभ व सहकारातील महामेरू माजी आमदार स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांचा आज, गुरुवारी (१ एप्रिल रोजी) सहावा स्मृतिदिन होत आहे. त्यांचे विचार आजही जिवंत असून, आठवणीतील सा. रे. पाटील कसे होते यानिमित्ताने घेतलेला आढावा...

.............

सन १९५२ ते १९९० या काळात राजकीय विचार मोठ्या प्रमाणात बदलत गेले. यामध्ये एक सहकार क्षेत्रातील योगदान व राजकीय घडामोडीत आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून सा. रे. पाटील यांचे नाव प्रथम पुढे आले होते. समाजवादी विचारसरणीचे आणि कष्टकरी, शेतकरी, कामगार यांना सुखाचे चार घास मिळावेत म्हणून गेली सात दशके अखंडपणे काम करणारे माजी आमदार डॉ. सा. रे. पाटील हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. राजकारणाला बाजूला ठेवून समाजकारणाला महत्त्व देणारे थोर व्यक्ती स्व. पाटील यांच्या हातून अखंडपणे समाजहिताचेच काम झाले. १९४६ ला जांभळी येथे सा. रे. पाटील यांनी विविध कार्यकारी सहकारी विकास संस्था स्थापन करून सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळावी, यासाठी शिरोळ तालुका खरेदी-विक्री संघाची स्थापना करून जयसिंगपूर-उदगाव बँक व शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या २० संस्था उभ्या करून शेतकऱ्यांना एक नवे साधन उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर विविध देशांतील अवगत तंत्रज्ञानाचा आढावा घेऊन कोंडिग्रे येथे फोंड्या माळावर विकसित श्रीवर्धन बायोटेकमध्ये मातीविना शेती विकसित केली. डॉ. सा. रे. पाटील यांनी १९७० ला स्व. खा. दत्ताजीराव कदम यांच्या समवेत श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सदस्य म्हणून कारखान्याच्या उभारणीस सुरुवात केली. कारखान्याला मंजुरी मिळविण्यापासून ते कारखाना प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी १९८० पासून कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. डॉ. सा. रे. पाटील यांनी सहकार क्षेत्रात अग्रेसर राहून चळवळीबरोबरच तीन वेळा आमदारकी भूषविली. राजकारण, निवडणुकांपेक्षाही त्यांचा मूळचा पिंड हा सेवादलाच्या सामाजिक काम आणि समाजवादी विचारसरणीशी घट्ट राहिला. एखाद्याच्या कामाबद्दलची तळमळ आणि तत्परता, प्रचंड स्मरणशक्ती, विविध क्षेत्रातील घडामोडींचे चालते-बोलते विद्यापीठच ते होते. त्यांच्या अनुभवामुळेच ‘दत्त’चा विकास झाला. त्यामुळेच श्री दत्त कारखान्याला भारत सरकार नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्याकडून अनेक उत्कृष्ट पुरस्कार मिळाले. वरील सर्व गोष्टींचा आढावा घेता सा. रे. पाटील यांचा आदर्श तालुक्यात व जिल्ह्यात न राहता राज्याबाहेरही व प्रेरणादायी विचारांची आठवण श्रमिकांसह शेतकऱ्यांसमोर आजही चिरंतर आहे. सा. रे. पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र गणपतराव पाटील दत्त उद्योग समूहाची धुरा सांभाळत आहेत. शेती व शेतकरी टिकला पाहिजे, यासाठी त्यांचा पुढाकार आहे. कॅन्सरमुक्त शिरोळ तालुक्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले. गो परिक्रमा, सेंद्रिय ऊस शेती, क्षारपडमुक्त जमीन व ठिबक सिंचन या माध्यमातून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. सा. रे. पाटील यांच्या कामाची प्रेरणा सर्वांनाच सतत मार्गदर्शन करणारी आहे. दीपस्तंभ म्हणून ते निश्चितपणे सर्वांच्या सोबत राहतील. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

..............

कोट -

स्व. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांनी आयुष्यभर शेतकरी आणि सामान्य लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले. समाजवादाचा विचार जोपासत असतानाच त्यांनी अनेक सहकारी संस्थांची निर्मिती करून शिरोळ तालुका व पंचक्रोशीचा विकास साधला. पद असो वा नसो, नेहमीच ते कार्यमग्न राहिले. कामगार, कार्यकर्ता असा भेदभाव न करता सर्वांशीच ते सलोख्याने वागले, म्हणूनच माणुसकीच्या नात्याने एकत्र आलेल्या माणसांचा गोतावळा मोठा होता.

गणपतराव पाटील

फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०३-गणपतराव पाटील, ०४-सा. रे. पाटील

Web Title: The beacon of cooperation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.