अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गुन्हेगारीचा बीमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:28 AM2021-08-28T04:28:02+5:302021-08-28T04:28:02+5:30
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ घटनास्थ़ळी कसे पोहोचावे, मदत कशी करावी, ऐनवेळी गुन्हेगारी परिस्थितीशी सामना कसा करावा, गर्दी-मारामारीसारखी परिस्थिती कशी हाताळावी, ...
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ घटनास्थ़ळी कसे पोहोचावे, मदत कशी करावी, ऐनवेळी गुन्हेगारी परिस्थितीशी सामना कसा करावा, गर्दी-मारामारीसारखी परिस्थिती कशी हाताळावी, आदी प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांना आठ ते दहा दिवसांचे दिले आहे. त्यातून पोलीस कर्मचारी चांगलेच तरबेज झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातही शहरी आणि ग्रामीण भागातील सुमारे ११६ पोलीस कर्मचाऱ्यांना याप्रकारचे विशेष प्रशिक्षण दिले आहे. आता ही यंत्रणा ‘डायल ११२’च्या माध्यमातून गुन्हेगारांशी सामना करण्यास परिपूर्ण झाली आहे. फक्त केंद्र शासनाकडून हा उपक्रम सुरू करण्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ची औपचारिकता बाकी आहे.
अत्याधुनिक मोटारव्हॅन, दुचाकी वाहने
तत्काळ घटनास्थळी पोहोचून मदत करण्यासाठी शासनाने एप्रिल महिन्यातच वाहनांचे मोठे ताफे प्रत्येक जिल्ह्याला दिले आहेत, कोल्हापूर जिल्ह्यासाठी या उपक्रमासाठी ३५ दुचाकी व १६ चारचाकी मोटारव्हॅन दाखल झाल्या आहेत. सर्व वाहनांना ‘जीपीआरएस’ सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. ही वाहने फक्त ‘डायल ११२’साठीच वापरायची आहेत. या वाहनांना तात्काळ चालकही उपलब्ध करून दिले आहेत.
‘मीस कॉल’चीही दखल
एखाद्या व्यक्तीने ‘डायल ११२’ ला मीसकॉल केला अगर संबंधित व्यक्तीने फोन करूनही त्यावर कोणतेही संभाषण केले नाही; तर कोणीतरी संकटात आहे, असाच हेतू धरून पोलीस यंत्रणा सतर्क होते. त्यातून पुन्हा आलेला कॉल लोकेशन शोधून त्या ठिकाणी यंत्रणा तातडीने तिकडे धाव घेते. घटनास्थळी पोहोचल्यावर परिस्थितीचा अंदाज घेत पोलीस पुढील कार्यवाही करतात. अनेकवेळा फसवे कॉल येतात व खिल्ली उडवली जाते, पण अशा फसव्या कॉलचाही पोलीस शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंदवणार आहेत.
सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची स्वतंत्र नजर
‘डायल ११२’ या नवतंत्रज्ञानाचा गुन्हेगारी कमी करण्यासाठी तसेच मदतीसाठी वापर होतो. तरीही जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शहरात सीसी टीव्ही यंत्रणेचे नेटवर्क उभारले आहे. अनेक ठिकाणी तेथील महानगरपालिका, नगरपालिका तसेच काही नागरिकांनी स्वत:च्या संरक्षणासाठी घराबाहेर, परिसरात सीसी टीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या परिसरात घडलेल्या घटनांचे चित्रण थेट सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद होते. त्यातून पोलीस गुन्हेगारांचा माग काढतात. त्याशिवाय गर्दी-मारामारीच्या ठिकाणी पोलिसांची सीसी टीव्हीची फिरती व्हॅन ठेवली आहे. नेत्यांच्या जाहीर सभा, मेळावा, मोठा मोर्चा अगर एखाद्या दाट वस्तीतील प्रसंगी ही पोलिसांची सीसी टीव्हीची फिरती व्हॅन कोपऱ्यावर उभी करून परिसराची पाहणी करते. त्यामुळे सर्वच गुन्हेगार समोर असले तरीही ते चुपचाप राहणेच पसंद करतात. त्यामुळे गुन्हेगारीला आपसुकच आळा बसतो.
कोल्हापूर जिल्हा दृष्टिक्षेप...
पोलीस ठाणे : ३१
पोलीस चौक्या (दूरक्षेत्र) : ३०
पोलीस अधिकारी : २४७
पोलीस कर्मचारी : २७१८
पोलीस वाहने : ३५ दुचाकी, १६ चारचाकी वाहने