'बीम्स'मध्ये ब्लॅक फंगसवर उपचार सुरू : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:26 AM2021-05-27T04:26:29+5:302021-05-27T04:26:29+5:30
देशभरात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण कर्नाटक राज्यात असून ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर आजपासून बीम्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास सुरुवात झाली ...
देशभरात ब्लॅक फंगसचे सर्वाधिक रुग्ण कर्नाटक राज्यात असून ब्लॅक फंगसच्या रुग्णांवर आजपासून बीम्स सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूने जगाला भेटीस धरले असताना आता हा नवीन धोका निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्हा रुग्णालयांमध्ये ब्लॅक फंगस उपचार कक्ष सुरू करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी आज बुधवारी पत्रकारांना दिली. जिल्ह्यात आजतागायत फंगसचे ८ ते १० रुग्ण आढळून आले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातील ब्लॅक फंगसच्या रुग्णांना हुबळीच्या किंम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची सूचना शासनाने केली होती. परंतु आता राज्यातील सर्व जिल्हा इस्पितळांमध्ये या रोगावर उपचार करण्याची सूचना देण्यात आली आहे. ब्लॅक फंगसवरील औषधे जिल्हा प्रशासनाला काल रात्री उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यानंतर लगेचच आजपासून बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचाराची सोय करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी स्पष्ट केले.