रस्त्याच्या कामावरून मारहाण, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2023 10:50 PM2023-02-16T22:50:58+5:302023-02-16T22:51:13+5:30
रस्त्याच्या कामावरून नुकसान केल्याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली होती.
कसबा सांगाव - बुधवार दि.१५ रोजी मौजे सांगाव (ता.कागल) येथे एका महिलेसह दोघांनाही झालेल्या मारहाणीतील गंभीर जखमी झालेले मारुती हरी पाटील (वय ६५) यांचा आज मृत्यू झाला. छ.प्रमिला राजे रूग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचं निधन झालं.
या बाबत कागल पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रस्ता करण्याच्या कारणावरून मुरूम टाकून मारुती पाटील यांचे नुकसान केले. त्यामुळे मारुती पाटील यांनी मुंबई उच्य न्यायालयात सात जणांविरोधात दावा दाखल केला आहे. त्याचा राग मनात धरून कृष्णात पाटील, एकनाथ केरबा पाटील, रघुनाथ कृष्णात पाटील, महादेव दत्तू पाटील, शांताबाई राजाराम पाटील, प्रकाश महादेव पाटील, सारिका प्रकाश पाटील, (सर्व वाडकर परिवार) यांनी काल बुधवारी मारुती पाटील यांच्या घरावर दगडफेक केली व त्यांच्या घराचे सुमारे ६००० हजाराचे नुकसान केले. तसेच मारुती पाटील व त्यांची सुन सुरेखा सचिन पाटील(वय ३६) यांना लाथा बुक्या व लाकडी वाशाने मारहाण करुन जखमी केले होते. तर रघुनाथ कृष्णात पाटील यांने मारुती पाटील यांच्या डोक्यात काठी व खोरे मारून तसेच पायावर दगड मारुन गंभीर जखमी केले होते.
त्यामुळे बुधवारी सुरेखा पाटील यांनी कागल पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार भा.द.वि.स.कलम ३०७, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तर ३०२ कलम लावण्यात आले आहे, अशी माहिती पो.उप निरीक्षक खडके यांनी दिली.