पाचगाव, कदमवाडीत किरकोळ कारणावरून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:56 PM2021-02-18T16:56:27+5:302021-02-18T17:01:50+5:30
Crimenews Kolhapur- फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका करू नका, असे सांगणाऱ्या युवकासह त्याच्या भावास अज्ञात तिघा जणांनी पाचगाव (ता. करवीर) येथे मारहाण केली तर कदमवाडीत सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला
कोल्हापूर : फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका करू नका, असे सांगणाऱ्या युवकासह त्याच्या भावास अज्ञात तिघा जणांनी पाचगाव (ता. करवीर) येथे मारहाण केली तर कदमवाडीत सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला
पोलिसांनी दिलेली माहिती माहिती अशी, फिर्यादी घोरपडे यांचे पाचगाव (ता. करवीर) येथे लक्ष्मी निवास फार्म हाऊस आहे. मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास गेंडा ऊर्फ डॉन नावाच्या इसमाने फार्म हाऊसच्या गेटसमोर लघुशंका केली, यावर फिर्यादीने त्यांना इथे असे कृत्य करू नका, पुढे जा, असे सांगितले. मी कोण आहे माहीत आहे का? मी डॉन आहे. गेंडा बाई म्हणतात मला, असे म्हणत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याच्यासोबत असलेल्या दोन अन्य अनोळखी इसमांनीही मारहाण केली.
याबाबत नीलेश महादेव घोरपडे (वय ३१, रा. समर्थ कॉलनी, संभाजीनगर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात गेंड्या नावाच्या अज्ञात इसमासह दोघांविरोधात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला. फिर्यादीसोबत असलेला त्याचा भाऊ निशाण यालादेखील या तिघांनी मारहाण केली. जाताना चारचाकीच्या काचाही फोडल्या. याचा तपास पोलीस नाईक गुरव करीत आहेत.
कदमवाडीत मारहाणीत एक जण जखमी
कोल्हापूर : सिगरेट नाही म्हटल्याच्या कारणावरून कदमवाडीत दोघांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला. याबाबतची फिर्याद शंकर अरुण शिंदे (वय २८, मूळ रा. बिळाशी, ता. शिराळा, जि. सांगली, सध्या रा. अयोध्या मित्रमंडळ चौक, कदमवाडी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलिसांत बुधवारी सायंकाळी दिली. त्यानुसार गुन्हा नोंद झालेल्यांमध्ये अधिक ऊर्फ पप्पा डाळके, संदीप ऊर्फ विक्रम पाटील, दोघे रा. कदमवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (दि. १६) रात्री पावणेबारा वाजता संशयित डाळके यांनी फिर्यादी शिंदे यांच्या अयोध्या चौकातील दुकानात येऊन सिगारेट मागितली. त्यांनी ती नाही म्हटल्यानंतर संशयिताने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ का करतोस, अशी फिर्यादीने विचारणा केली असता संशयिताने पाटील यास फोन करून बोलावून घेतले.
यादरम्यान संशयित पाटील याने थेट आल्यानंतर फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान संशयिताने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात या दोन संशयितांविरुद्ध फिर्याद दिल्यानुसार गुन्हा दाखल झाला. याबाबतचा तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.