पत्नीला मारहाण करून पतीनेच दागिन्यांसह रोकड जबरदस्तीने घेतली काढून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:53 PM2019-11-27T12:53:39+5:302019-11-27T12:56:58+5:30
या वादातून त्याने पत्नीला शिवीगाळ केली. शारदादेवी यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अधिकच संतप्त झाला. त्याने बेदम मारहाण करून चाकूचा धाक दाखविला. तुझ्याजवळ असलेले सर्व दागिने आणि पैसे आताच्या आता दे, अशी धमकी दिली.
कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पत्नीला चाकूचा धाक दाखवून गोळीबार करण्याची धमकी देऊन पतीनेच चार तोळे वजनाची सोन्याची चेन, अर्धा लाखाची रोकड असा सुमारे एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी संशयित संग्रामसिंह जयसिंगराव गायकवाड (वय ६३, रा. गायकवाड वाडा, शुक्रवार पेठ) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी त्याची पत्नी शारदादेवी संग्रामसिंह गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. २४ नोव्हेंबरच्या रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.
लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठेत संग्रामसिंह गायकवाड यांचा वाडा आहे. २४ नोव्हेंबर रोजी किरकोळ कारणावरून संग्रामसिंह याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादातून त्याने पत्नीला शिवीगाळ केली. शारदादेवी यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अधिकच संतप्त झाला. त्याने बेदम मारहाण करून चाकूचा धाक दाखविला. तुझ्याजवळ असलेले सर्व दागिने आणि पैसे आताच्या आता दे, अशी धमकी दिली.
दागिने देण्यास नकार दिल्याने त्याने मुलगा विजयसिंह याला फोन करून आईला गोळी घालण्याची धमकी दिली. या प्रकारानंतर त्याने पत्नीच्या अंगावरील असलेले दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी शारदादेवी यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने पुन्हा मारहाण केली. चार तोळे वजनाची सोन्याची चेन आणि कपाटातील ५० हजारांची रोकड घेतली. घरातील तिजोरीच्या किल्ल्याही हिसकावून घेतल्या. जबरदस्तीने एक लाख दहा हजारांचे दागिने काढून घेतले.
या प्रकारानंतर शारदादेवी भयभीत झाल्या. कुटुंबाची बदनामी नको म्हणून त्यांनी सोमवारी फिर्याद दाखल केली नाही. मात्र, संग्रामसिंह याने सोमवारी त्रास दिल्याने त्यांनी मंगळवारी (दि. २६) सायंकाळी त्याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन संग्रामसिंह याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संग्रामसिंह शेती करतो. त्याला दोन मुले असून, दोघेही डॉक्टर आहेत.