विजेच्या कडकडाटात ‘सुंदर’ बिथरला

By Admin | Published: June 3, 2014 01:04 AM2014-06-03T01:04:40+5:302014-06-03T01:25:59+5:30

पाहण्यासाठी गर्दी : दुसर्‍या दिवशीही मोहीम अपयशी

'Beautiful' bitten in lightning | विजेच्या कडकडाटात ‘सुंदर’ बिथरला

विजेच्या कडकडाटात ‘सुंदर’ बिथरला

googlenewsNext

वारणानगर : सोमवारी रात्री साडेसात वाजण्याची वेळ... सुंदरला हलविण्यासाठी वनविभाग व केरळा फेडरेशनच्या टीमने केलेली जय्यत तयारी, शेडमधून ‘सुंदर’ बाहेर पडायला आणि विजांचा कडकडाट, जोराचा वारा, सुंदरला मिळालेली वरुणराजाची साथ आणि जोतिबा देवाची पाठीशी असणारी शक्ती यामुळे ‘सुंदर’ आजही दुसर्‍या दिवशी जाऊ शकला नाही. दरम्यान, रात्रीची वेळ असतानाच ज्यावेळी ‘सुंदर’ला शेडमधून बाहेर काढले, त्यावेळेस जोराचा वारा, वादळ आणि वीज गेल्याने ‘सुंदर’ बिथरला. त्यावेळेस ‘सुंदर’चा माहूत हैदर याने अशा स्थितीत मोठ्या धाडसाने ‘सुंदर’ला शांत करण्यात यश मिळवले, परंतु ज्यावेळी ‘सुंदर’ बिथरला होता, त्यावेळी वनविभाग केरळा टीमचे कर्मचारी ‘सुंदर’वर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा शेड सोडून बाजूलाच सरकू लागले. अखेर माहूत हैदर यानेच ‘सुंदर’ला सुरक्षित ठिकाणी आणून शांत केले. वनविभागाची टीम मात्र कुचकामी ठरली. आता उद्या, मंगळवारी दुपारी पुन्हा ‘सुंदर’ला हलविण्याची मोहीम राबविण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेले दोन दिवस वनविभाग कोल्हापूर व केरळा एलिफंट ओनर असोसिएशनची टीम ‘सुंदर’ला कर्नाटकमध्ये नेण्याच्या प्रयत्न करीत आहे. आज दुसर्‍याही दिवशी सुंदर जाण्यास तयार नाही. ‘सुंदर’ माणसाळलेला आहे. जोतिबा परिसरात रमलेला आहे. आज तो ठणठणीत आहे, परंतु ‘पेटा’ने केलेल्या तक्रारीमुळे ‘सुंदर’ला हलविण्याचा आदेश सुप्रीम न्यायालयाने दिल्यामुळे ‘सुंदर’ला हलविण्याचा प्रयत्न वनविभाग करीत आहे. आज दुसर्‍या दिवशी सायंकाळी साडेसातला ‘सुंदर’ला शेडमधून बाहेर आणताच जोराचा वारा, वादळ, विजांचा कडकडाट आणि वरुण राजाचे जोराचे आगमन सुरू झाले. अशा स्थितीतही ‘सुंदर’ला माहूत हैदर ट्रककडे नेण्याचा प्रयत्न करीत होता, परंतु तासाभराच्या गोंधळात सुंदर बिथरला. हैदरने धाडसाने ‘सुंदर’ला शांत केले. जर सुंदर बिथरून बाहेर पडला असता, तर अनर्थ घडला असता. यावेळी जमलेल्या नागरिकांनी ‘सुंदर’ला दोन दिवस होत असलेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त करून, ‘सुंदर’ला होणार्‍या त्रासापासून थांबवावे, अशी मागणी वनविभागाच्या काही अधिकार्‍यांकडे केली. यावेळी हातकणंगले पं. स.चे उपसभापती प्रदीप देशमुख, सातवेचे माजी सरपंच संजय दळवी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पेठवडगावचे स. पो. नि. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Web Title: 'Beautiful' bitten in lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.