पोलिसांची सुंदर प्रतिमा जनमानसात रूजविणार
By admin | Published: June 27, 2016 11:28 PM2016-06-27T23:28:30+5:302016-06-28T00:35:32+5:30
अमोघ गावकर : जिल्ह्याची सुंदरता अबाधित राखण्याचा प्रयत्न करू
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुंदरतेप्रमाणे पोलिसांची सुंदर प्रतिमा येथील जनमानसात रूजविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. त्याचप्रमाणे पोलिसांच्याही काही प्रश्नांची निर्गत लावण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सकारात्मक विचार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
भारतीय पोलिस सेवेच्या २०११ बॅचच्या अमोघ जीवन गावकर यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक म्हणून झाली. सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यापूर्वी ते परभणी येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. आज पत्रकारांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली असताना त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या.
महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा हा खुप सुंदर जिल्हा आहे, असे सांगताना गावकर म्हणाले, या सुंदर जिल्ह्याप्रमाणे पोलिसांची सुंदर प्रतिमा माणसांमध्ये दिसली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील राहू. लोकांमध्ये पोलिस विभागाबद्दल विश्वास व त्यांच्याकडे निर्भयपणे आपल्या आपल्या अन्यायाविरोधात दाद मागता आली पाहिजे. येथील जनता ही शांतताप्रिय आहे. अनेक बाबतीमध्ये जसे शिक्षणात जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याची सुंदरता अबाधित राखण्याचा आपण प्रयत्न करू.
त्याचबरोबर पोलिसांचे काही प्रश्न आहेत. जसे त्यांच्या निवासाची सोय व तत्सम त्याचीही माहिती घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल. जे अधिकारी व कर्मचारी काम करतात. त्यांना निश्चितपणे प्रोत्साहन दिले जाईल. मात्र जे हेतूपुरस्सर काम टाळतील त्यांची गय केली जाणार नाही.
जिल्ह्यातील सध्याचे ज्वलंत विषय काय याबाबतही त्यांनी पत्रकारांकडून थोडी माहिती घेतली. येथील अवैध धंदे, पर्यटकांची होणारी लूट, मद्य वाहतूक आदींबाबत त्यांनी चर्चा केली. लवकरच या विषयावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. या अनुषंगाने जिल्ह्याचे चेकपोस्ट अधिक सक्षम करणे, अवैध वाहतुकीला आळा घालणे, या गोष्टीवरही लक्ष दिले जाईल. असे ते म्हणाले.
सध्या सिंधुदुर्गात मान्सूनमुळे आपत्ती व्यवस्थापन हा एक अग्रमानांकित विषय आहे. काहीही झाले तरी प्रथम पोलिसांना पाचारण केले जाते. म्हणूनच आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण जास्तीत जास्त लवकर कशी मदत देऊ शकू याचा आढावाही घेतला जाणार आहे. गजबजणाऱ्या ठिकाणी सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया स्तरावर कार्यवाही सुरू आहे. या वर्ष अखेर पर्यंत जिल्ह्यातील काही ठराविक ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित केली जातील. त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसू शकेल. सिंधुदुर्गात एकूणच गुन्ह्याचे प्रमाण कमी आहे. येथील जनताही शांतताप्रिय आहे. जिल्हा वासियांना या शांतता सुरक्षिततेच्या वातावरणात बाधा येवू दिली जाणार नाही. याची दक्षता आपण घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)
अवैध धंद्यांना थारा देणाऱ्यांवर कारवाई करणार
जिल्ह्यात अवैध धंदे सुरू असल्यास अशा धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, असे गावकर यांनी स्पष्ट केले. पोलिस अधीक्षकपद पुन्हा एकदा कार्यरत झाल्यामुळे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था आबाधित राहील असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.